चालकास मारहाण करून मालट्रक पळविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:22 AM2021-04-21T04:22:55+5:302021-04-21T04:22:55+5:30
करमाळा : अहमदनगर-टेंभुर्णी महामार्गावर एका चालकास मारहाण करून चक्क ट्रकच पळवून नेल्याची घटना १७ एप्रिल रोजी मध्यरात्री २.५०च्या सुमारास ...
करमाळा : अहमदनगर-टेंभुर्णी महामार्गावर एका चालकास मारहाण करून चक्क ट्रकच पळवून नेल्याची घटना १७ एप्रिल रोजी मध्यरात्री २.५०च्या सुमारास घडली. या प्रकरणी करमाळा पोलिसांनी चौघांविरोधात सोमवारी गुन्हा नोंदला आहे.
याबाबत गाळाप्पा रामचंद्रआप्पा उपार (वय ४३, रा. रेकुलगी, जिल्हा बिदर, कर्नाटक) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलीस सूत्राकडील माहितीनुसार चालक गाळाप्पा हा अरविंद जमादार (रा. मल्लाकेळी, जिल्हा बिदर) यांची मालकीच्या माल ट्रक (के. ए.३९, ५३१४) वर आठ दिवसांपासून ड्रायव्हर म्हणून काम करत होता. त्याच्या सोबत इमामासाब हुशेनसाब सय्यद हासुध्दा चालक म्हणून काम करतो. १६ एप्रिल रोजी चार वाजता दोघे जण माल ट्रकमध्ये रद्दी कागद घेऊन नाशिक येथून मनाईकेळी (बिदर, कर्नाटक) येथे निघाले होते.
अहमदनगर-टेंभुर्णी मार्गावर जेऊरहून कविटगाव मार्गे पुढे निघाले. पुढे कंदरगावाकडे जात असताना हॉटेल शिवकृपाजवळ आले असता १७ एप्रिलच्या रात्रौ २.५० वाजण्याच्या सुमारास रस्त्यावर गाडीचे चाक उचलण्याचे जॅक आणि टाॅमी पडलेली दिसली. ते काय आहे हे पाहण्यासाठी चालकाने माल ट्रक थांबविला. इतक्यात चार अनोळखी व्यक्ती समोर आले. त्यापैकी एकाच्या हातामध्ये लोखंडी रॉड होता. ताे अंगावर धावून येऊन चालकाच्या डाव्या हातावर मारले. या मारहाणीत चालक जखमी झाला. त्यानंतर त्याला ट्रकच्या खाली ओढले व चालकाच्या पाठीवर हाताने लाथाबुक्क्याने मारहाण केली. त्यानंतर इमामासाब हुशेनसाब सय्यद यालाही त्याच पद्धतीने मारहाण केली. दोघेही रस्त्याचे बाजूला पडले. त्यानंतर अनोळखी दोघे जण आले आणि रोख ४००० हजार व आधारकार्ड, मोबाइल फोन काढून घेतले.
---
दोघांचेही हातपाय बांधून पिकात टाकले
त्यानंतर चालकाला उसाच्या शेतात आणि दुसरा चालक इमामासाब हुशेनसाब सय्यद याला केळीच्या शेतात हातपाय बांधून टाकून दिले. त्यानंतर माल ट्रक चालू करून त्या चौघांनी ट्रक पळवून नेला. काही वेळानंतर त्या दोघांनी यातून सुटका करून घेतली.
----