सकाळपासून रिमझिम पाऊस, दुपारनंतर जोरदार बॅटिंग; ७ दिवसांत १४६ टक्के नोंद
By Appasaheb.patil | Published: June 11, 2024 06:02 PM2024-06-11T18:02:07+5:302024-06-11T18:03:37+5:30
सोलापूर शहरात सोमवारी रात्री अकरा वाजेपासून मंगळवारी दुपारचे दोन वाजले तरी पावसाची संततधार सुरू आहे
आप्पासाहेब पाटील, सोलापूर: आज मंगळवार सकाळपासूनच सोलापूर शहरासोबतच ग्रामीण भागात रिमझिम पाऊस सुरू होता. मात्र दुपारनंतर पावसाने चांगलाच जोर धरला आहे. दुपारी तीननंतर पावसाने शहरात जोरदार बॅटिंग सुरू केली. यंदा रोहिणी व मृग नक्षत्रात सोलापूर जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडत आहे. मागील सात दिवसात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. सोलापूर जिल्ह्यात मागील आठवड्याभरात १४६.५८ म्हणजेच सरासरी १५०.५ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद हवामान विभागाकडे झाली आहे. त्याबाबतची आकडेवारी मंगळवारी सकाळी जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली.
उजनी धरण क्षेत्रातही जोरदार पाऊस पडत आहे, त्यामुळे उजनीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. यासोबतच सीना व भीमा नदीक्षेत्रात पडलेल्या पावसामुळं नद्यांना चांगले पाणी आले आहे. जिल्ह्यातील ओढे, नाले, धरणं भरून वाहत आहेत. बार्शी, पंढरपूर, सोलापूर शहर, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, सांगोला आदी तालुक्यात समाधानकारक पाऊस पडला आहे. सोलापूर शहरानंतर दुष्काळी माळशिरस तालुक्यात सर्वाधिक म्हणजेच ११३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वात कमी पाऊस मंगळवेढा तालुक्यात पडला आहे.
सोलापूर शहरात सोमवारी रात्री अकरा वाजेपासून मंगळवारी दुपारचे दोन वाजले तरी पावसाची संततधार सुरू आहे. त्यानंतर म्हणजेच दुपारी तीन वाजेनंतर सोलापुरात पावसाने चांगलाच जोर धरला. या पावसाच्या पाण्यामुळे शहरातील विविध भागात पाणीच पाणी साचले आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.