पंढरीत लपून प्रवेश करणाºयांवर ड्रोन कॅमेºयाचे लक्ष : सुहास वारके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 03:53 PM2020-06-27T15:53:50+5:302020-06-27T15:57:38+5:30
प्रत्येक जिल्ह्यात घेतल्या बैठका; १५०० जणांचा राहणार पोलीस बंदोबस्त
सचिन कांबळे
पंढरपूर : प्रत्येक आषाढी यात्रेत गर्दी असते. गर्दीमुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचे काम आम्ही करत असतो; मात्र यंदा गर्दीच होऊ नये, नागरिकांना कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. पंढरपूरमध्ये वारकºयांना प्रवेशबंदी केली आहे. तरी वारकरी छुप्या मार्गाने प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेºयाचा उपयोग करणार असल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर वारके हे पंढरपुरात आले होते. यावेळी त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे, पोनि दयानंद गावडे उपस्थित होते.
वारके म्हणाले की, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी यात्रेसाठी कोणत्याही वारकºयाला पंढरपूरमध्ये आषाढी यात्रा न होऊ देण्याची भूमिका शासनाने घेतली आहे. यामुळे यात्रेत सहभागी होऊ नका, हे वारकºयांना सांगण्यासाठी पालखी असणाºया जिल्ह्यात बैठक घेतली आहे. तसेच दिंडी प्रमुखांना सूचना दिल्या आहेत.
तरीही वारकरी पंढरपुरात येऊ नये, यासाठी १५०० पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात येणार आहे. त्यामध्ये अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड सहभागी असणार आहे. या सर्व कर्मचाºयांना कोरोना विषयी काळजी घेण्यासाठी डेटॉल, मास्क, सॅनिटायझर व इतर आवश्यक साहित्य असलेले किट देण्यात येणार आहे. त्याचबरोबर दररोज थर्मल स्क्रीनिंग तपासणी करण्यात येणार असल्याचे सुहास वारके म्हणाले.
पंढरपुरात आजपासून प्रवेश बंदी
आषाढीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारपासून पंढरपुरात बाहेरून येणाºयाला नो एन्ट्री करण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यात तीनस्तरीय नाकाबंदी केली आहे. यामुळे कोणत्याही मार्गाने बाहेरच्या कोणाला शहरात प्रवेश करता येणार नसल्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके यांनी सांगितले.