आधुनिक शेतीसाठी भविष्यात शेतकऱ्यांच्या हाती असणार ड्रोन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:24 AM2020-12-06T04:24:18+5:302020-12-06T04:24:18+5:30
आजही शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करत आहेत. बदलत्या हवामानामुळे पिकांवर विविध प्रकारचे रोग पडत असतात. पिकांवर रोग पडल्याने उत्पादनात ...
आजही शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करत आहेत. बदलत्या हवामानामुळे पिकांवर विविध प्रकारचे रोग पडत असतात. पिकांवर रोग पडल्याने उत्पादनात घट येत असून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. तसेच कामगार मिळत नसल्याने शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी वाढल्या आहेत.
यामुळे श्री विठ्ठल अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. प्रशांत पवार यांनी ड्रोनच्या सहाय्याने पिकांवर लक्ष ठेवण्याचे संशोधन सुरु केले आहे. या संशोधनासाठी महाराष्ट्र शासनाच्या राजीव गांधी रिचर्स फाउंडेशनने ४५ लाखांचा निधी मंजूर केला आहे. तीन वर्षांत संशोधन पूर्ण करुन शेतकऱ्यांसाठी खुले करण्यात येणार आहे.
संशोधनासाठी शासनमान्य १२ लाख रुपयांचे ड्रोन घेण्यात येणार आहे. ड्रोनच्या साहाय्याने १५ लिटरपर्यंत पिकांवर औषध फवारणी करण्यात येणार आहे. पिकांचे फोटो काढता येतील. यामुळे पिकांच्या वाढीवर लक्ष राहणार आहेत. पक्षी पिकांची नासाडी करू नये, यासाठी ड्रोनमधून विविध आवाज देखील येणार आहेत. ड्रोनमधून घेण्यात येणाऱ्या फोटोच्या माध्यमातून पिकांच्या उत्पादनाचा अंदाज बांधणे. त्यानंतर आवश्यकतेनुसार करणे. अशी कामे करता येणार. हे संशोधन शेतकऱ्यांच्या फायद्याचे ठरणार असल्याचे डॉ. प्रशांत पवार यांनी सांगितले.
ड्रोन बनवण्यासाठी प्रयत्न
बाजारात विविध कंपनीचे, विविध पद्धतीचे ड्रोन आहेत. मात्र भारतीय बनावटीचेच ड्रोन वापरावे लागणार आहेत. तसेच शासन मान्यता असलेले ड्रोन शेतकऱ्यांना घ्यावे लागणार आहेत. आवश्यक तेवढ्या उंचीवर उडणारे व कमी किमतीत ड्रोन मिळावे यासाठी ड्रोन बनवण्यासाठी देखील संशोधन करणार असल्याचे डॉ. प्रशांत पवार यांनी सांगितले.