दुष्काळ नियोजन ; सोलापूर जिल्ह्यात २१७ चारा छावण्यांचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2018 02:35 PM2018-11-06T14:35:42+5:302018-11-06T14:37:17+5:30
५३४ कोटींचा आराखडा; ६० हजार हेक्टरवरील खोडवा ऊस निघाल्यावर होणार चाºयाची लागण
सोलापूर : जिल्ह्यातील दुष्काळी स्थिती पाहून संभाव्य चाराटंचाईचे नियोजन जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे करण्यात आले आहे. यामध्ये २१७ चारा छावण्यांचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, यासाठी ५३४. १२ कोटी खर्चाचा आराखडा विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.
पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांच्याबरोबर शनिवारी व्हिडीओ कॉन्फरन्स झाली. या बैठकीत त्यांनी जिल्ह्यात दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६ नुसार ९ तालुक्यात गंभीर स्वरूपाचा दुष्काळ जाहीर झालेला आहे. जिल्ह्यात सरासरीच्या केवळ ३८ टक्के पाऊस झाल्यामुळे भविष्यामध्ये चारा व पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. चाराटंचाईमध्ये सन २०१२-१३ च्या दुष्काळाच्या वेळेस १९३ तर २०१३-१४ मध्ये २७८ छावण्या उघडण्यात आल्या होत्या. या छावण्यांमध्ये २ लाख २० हजार ९१८ मोठी जनावरे, ३३ हजार ७०९ लहान जनावरे दाखल झाली होती. यावर्षीच्या नियोजनाप्रमाणे जिल्ह्यात २ लाख ३० हजार १४४ लहान व ९ लाख ४९ हजार ८८२ लहान अशी एकूण ११ लाख ८० हजार २६ इतकी जनावरे आहेत. या जनावरांना प्रतिदिन ६३०० मे. टन चारा लागतो. जिल्ह्यात सद्यस्थितीत ओला व सुका चारा १४८१ लक्ष मे. टन उपलब्ध असून, फेब्रुवारीपर्यंत हा साठा पुरेल, असा अंदाज आहे.
त्यामुळे फेब्रुवारीनंतर चाºयाची टंचाई निर्माण होणार हे गृहीत धरून राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत चारा लागवडीसाठी ९५ लाख २४ हजार इतका निधी उपलब्ध करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत सिंचनाची सोय असलेल्या शेतकºयांना मका व ज्वारीचे बियाणे १०० टक्के अनुदानावर वितरित करण्यात येणार आहे. यात मक्याचे २३ हजार २९५ किलो तर ज्वारीचे ६६ हजार ५९६ किलो बियाणे वितरित करण्याचे नियोजन असून, यातून २०७१ हेक्टरावर लागवड होईल, असे नियोजन आहे. पशुसंवर्धन विभागातर्फे २० नोव्हेंबरपर्यंत हे बियाणे शेतकºयांना पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
वैरण विकास अंतर्गत डीपीसीतून झेडपीला ५० लाखांचा निधी देण्यात आला आहे. यातून १६ हजार ३०० मका व ३ हजार ४९६ किलो ज्वारीचे बियाणे आणि १७ लाख ५ हजार बाजरीचे नेपीअर ठोंबे वितरित करण्यात येणार आहेत. या ठोंब्याचा लाभ ९ हजार ६७२ शेतकºयांना होईल. यातून ८ हजार ६९३ टन मका व १ लाख ३९ हजार ८४० टन बाजरीचा चारा फेब्रुवारीअखेर उपलब्ध होईल, असे झेडपीच्या पशुधन अधिकाºयांनी नियोजन केले आहे. झेडपीला आणखी ५० लाखांचा निधी देण्याचे नियोजन आहे. आत्मा पीक प्रात्यक्षिक योजनेंतर्गत ४ लाखांची तरतूद आहे. यातून मका व बाजरीचे ६५० किलोचे बियाणे वाटप करण्यात येणार आहे. अन्नसुरक्षा योजनेंतर्गत १९ लाखांची तरतूद आहे. त्यातून २९ हजार किलो ज्वारीच्या बियाणांची मागणी कृषी विभागाकडून महाबीजकडे करण्यात आली आहे. यातून ७ हजार शेतकºयांना बियाणे वाटपाचे नियोजन असून, यातून ३० हजार टन ओला चारा उपलब्ध होईल, असे नियोजन आहे. पशुसंवर्धन विभागाच्या जुनोनी, महुद येथील सीड फार्ममध्ये ४०० टन नेपीअर ठोंबे चारा लागवड करण्याचे निर्देश दिले आहेत.
उसाचा चारा उपलब्ध करणार
- जिल्ह्यात उसाचे १ लाख ५९ हजार हेक्टर क्षेत्र आहे. यामध्ये आडसालीखालील क्षेत्र २४ हजार, पूर्वहंगामी ५० हजार, सुरूचे २५ हजार आणि खोडव्याचे ६० हजार हेक्टर क्षेत्र आहे. उसातून मोठ्या प्रमाणावर वाढ्याचा चारा उपलब्ध होणार आहे. परभणी येथील कृषी महाविद्यालयाने सुक्या चाºयाबाबत केलेल्या परिगणनेमध्ये प्रतिहेक्टरी ४ टन वाढ्याचा चारा उपलब्ध होऊ शकतो, असे कळविलेले आहे. त्यामुळे वाढ्यातून ६ लाख टन चारा उपलब्ध होणार आहे.
पावसाअभावी निर्माण झालेल्या स्थितीमुळे ६० हजार हेक्टर क्षेत्रावरील खोडवा उसापैकी ७० टक्के ऊस काढण्यात येत आहे. यातील ४० हजार हेक्टर क्षेत्रावर वैरण विकास कार्यक्रम राबविल्यास चारा उपलब्ध होऊ शकेल, असे गृहीत धरून प्रत्येक शेतकºयाला हेक्टरी ७५ किलो बियाणे द्यावे लागेल. अशाप्रकारे ३० हजार क्विंटल बियाणे या क्षेत्रासाठी लागणार आहे. यासाठी १५ कोटी लागणार असून, यातून १० लाख टन चारा उपलब्ध होणार आहे. याप्रमाणे चाºयाचे नियोजन केल्यास छावणीमध्ये ६० टक्के जनावरे येतील, असा अंदाज आहे. मे २०१९ अखेर छावण्यांची संख्या २०५ वर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.