दूध संघ... दीड वर्षात चार कोटी व्याजाचा भुर्दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:20 AM2021-07-25T04:20:16+5:302021-07-25T04:20:16+5:30
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा दूध संघ, लेबर फेडरेशन व जिल्हा परिषद माजी आमदार सुधाकर परिचारक, वि. गु. शिवदारे, ...
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा दूध संघ, लेबर फेडरेशन व जिल्हा परिषद माजी आमदार सुधाकर परिचारक, वि. गु. शिवदारे, बाबूराव चाकोते, ब्रह्मदेव माने, भाई एस. एम. पाटील, गणपतराव देशमुख, विजयसिंह मोहिते पाटील हे जेव्हा एकमताने निर्णय घेत होते तेव्हा या सर्वच संस्था नावारूपाला आल्या होत्या. कोट्यवधीचे उत्पन्न व ठेवी असणारे लेबर फेडरेशनचे दिवाळे काढले. अतिशय कमी निधी मिळत असताना गुणवत्ता, प्रामाणिकपणा, सचोटी व एकमुखी निर्णयामुळे राज्यात जिल्हा परिषदेचे नाव होते. जिल्हा मध्यवर्ती बँक व जिल्हा दूध संघाचा बोलबाला तर सर्वपरिचित आहे. मात्र, या सर्व संस्था कोलमडल्या आहेत. यामुळेच जिल्हा मध्यवर्ती बँक व जिल्हा दूध संघावर प्रशासक नेमले आहेत.
जिल्हा बँकेची आर्थिक घडी बसत असताना दूध संघ मात्र मोठ्या अडचणीत आहे. अडचणीतून संघ बाहेर काढण्यासाठी मागील संचालक मंडळाने प्रयत्न केले असते तर ही वेळ आली नसती. तत्कालीन चेअरमन प्रशांत परिचारक यांनी संघाची वाशी (मुंबई) येथील जागा विक्रीला काढली होती. याला काही संचालकांनी विरोध केला. त्यानंतर मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये चार कोटी रुपये कर्ज काढले आहे. यामुळे कर्जाची रक्कम व दरमहा व्याजही वाढले आहे. दर महिन्याला २५ लाख रुपये व्याजापोटी भरावे लागत आहेत.
---
...तर चार कोटी वाचले असते
डिसेंबर १९१९ मध्ये सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची मुंबईची (१०१६.४७ चौ.मी., बांधकाम ९८५.८७ चौ. मी., २ पॅकिंग मशीन) जागा विक्रीला काढली होती. त्याचवेळी ही जागा विक्री केली असती तर आतापर्यंतचे चार कोटी रुपये वाचले असते. शिवाय संघावरील कर्ज कमी झाल्याने अद्ययावत मशिनरी व इतर विस्तार करता आला असता.
---
चेअरमन प्रशांत परिचारक यांनी मुंबईची जागा विक्रीचा घेतलेला निर्णय योग्य होता. दूध संघ बुडविण्याची मानसिकता असलेल्यांनी विरोध केला. यांच्यामुळेच संघाचे नुकसान झाले. -राजेंद्रसिंह राजेभोसले माजी संचालक, दूध संघ
---