देणी फेडण्यासाठी दूध संघ मुंबईची जागा विकणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:27 AM2021-07-07T04:27:49+5:302021-07-07T04:27:49+5:30
यापूर्वी हीच जागा संचालक मंडळानेही विक्रीला काढली होती. आर्थिक अडचणीत सापडलेल्या सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचा कारभार सुधारत ...
यापूर्वी हीच जागा संचालक मंडळानेही विक्रीला काढली होती.
आर्थिक अडचणीत सापडलेल्या सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचा कारभार सुधारत नसल्याने संचालक मंडळ विभागीय उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांनी बरखास्त केले होते. त्यानंतरही मार्च महिन्यात प्रशासकीय मंडळाची नियुक्ती करण्यात आली. त्याला आता चार महिन्यांचा कालावधी उलटला. मात्र, आर्थिक अडचण दूर झाली नाही. संघापुढील आर्थिक अडचणी कमी करण्यासाठी प्रशासकीय मंडळाने कडक धोरण घेतले असले, तरी येणे व देणे यात मोठी तफावत असल्याने ताळमेळ जमेना झाला आहे. यामुळे जिल्हा संघाची मुंबईची १०१६.४७ चौ.मी. जागा इमारत, मशिनरी विक्री करण्याचा प्रस्ताव विभागीय उपनिबंधक कार्यालयाला सादर केला आहे.
दूध पंढरीला दूध विक्री, पशुखाद्य, गाय खरेदी, दूध संस्था व वाहतूक संस्थेला दिलेली अनामत तसेच इतर १८ कोटी १८ लाख ४० हजार रुपये येणे आहे. न्यायालयीन प्रक्रियेमुळे हे पैसे कधी येतील, हे सांगता येत नाही. मात्र, संघाला विविध प्रकारचे ४४ कोटी ७१ लाख ९० हजार रुपये देणे आहे. दूध उत्पादक शेतकरी, पशुखाद्यासाठी खरेदी केलेला मका, कर्मचाऱ्यांचे वेतन, सेवानिवृत्तांची देयके तसेच विविध बॅंका, असे ४४ कोटी ७२ लाख रुपये देणे आहे. येणे व देण्याचा ताळमेळ जमत नसल्याने जागा विक्री हाच पर्याय असल्याचे प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष श्रीनिवास पांढरे यांनी सांगितले.
----
दर महिना बॅंकाचे व्याज २५ लाख
एचडीएफसी बॅंक २४ कोटी, मनोरमा बॅंक एक कोटी, जिल्हा मध्यवर्ती बँक दीड कोटी व उचल केलेले एक कोटी २० लाख रुपये असे २६ कोटी ७६ लाख रुपये देणे आहे. बॅंकांचे दर महिन्याला २५ लाख रुपये व्याज होते. बॅंकांनी ठरवून दिल्याप्रमाणे मुद्दल व त्यावरील व्याज भरले नाही तर देण्यात भर पडते.
----
यापूर्वी जागा विक्रीला शासनाने परवानगी दिली होती. संचालक मंडळाने हीच जागा विक्री करायची नाही असा ठराव घेतला होता. प्रशासकांनी घेतलेल्या निर्णयाला विरोध राहील. माझ्या काळात ८० हजार लिटर दूध संकलन होत होते, ते आता ३२ हजारांवर आले आहे.
- दिलीप माने
माजी चेअरमन, दूध संघ
----सर्व खर्चावर मर्यादा आणल्या. मात्र, जुने देणे व येणे यात मोठी तफावत आहे. खेळते भांडवल नाही. येणे कधी येईल ते सांगता येत नाही. मात्र, देणे द्यावे लागत आहे. आता मुंबईची जागा विक्री करण्याचा प्रस्ताव आहे.
- श्रीनिवास पांढरे
अध्यक्ष, दूध संघ प्रशासकीय मंडळ