या कारणामुळे केली खासगी रूग्णालयात अकौंटंटने मुलासह आत्महत्या...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 11:37 AM2020-05-18T11:37:02+5:302020-05-18T11:42:08+5:30
सोलापुरातील घटना; अन् प्रेत सापडले कर्नाटक राज्याच्या हद्दीत
सोलापूर : ना कसला ताणतणाव, ना डोक्यावर कसलेच कर्ज... असे असतानाही नागराज कनाळे याने आत्महत्या करुन स्वत:बरोबरच मुलाचीही जीवनयात्रा संपवली. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पेट्रोल आणतो म्हणून नागराज हा शुक्रवारी आपल्या घोंगडे वस्तीतील घराबाहेर पडला अन् त्याच्यासह मुलाचे प्रेत शनिवारी सकाळी झळकी (जि. विजयपूर, कर्नाटक) येथील भीमा नदीच्या बंधाºयातील पाण्यात तरंगत असताना आढळून आले होते.
नागराज कनाळे हे एका खासगी रूग्णालयात अकौंटंट म्हणून कामाला होते. ते पत्नी व दोन मुलांसह घोंगडे वस्ती येथे राहत होते. नागराज कनाळे हे शांत स्वभावाचे होते. त्यांना ९ वर्षाची मुलगी असून, ती चौथीमध्ये शिकत आहे. समर्थ कनाळे हा ५ वर्षाचा होता. तो श्री दिगंबर जैन गुरूकुल बालक मंदिरात लहान गटात शिकत होता. सर्व काही व्यवस्थित होतं. गेल्या ४ ते ५ दिवसांपासून नागराज कनाळे हे एकदम शांत झाले होते. ते जास्त कोणाला बोलत नव्हते. शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे उठले. अंघोळ झाल्यानंतर ते पेट्रोल भरण्यासाठी जातो असे म्हणून निघाले. सोबत मुलगा समर्थ याला घेतले. एक तास झाला... दोन तास झाले...दुपार झाली तरी नागराज कनाळे हे घरी आले नाहीत. दरम्यान पत्नी घराची स्वच्छता करीत असताना माळावर ठेवलेली चिठ्ठी मिळाली. चिठ्ठीत नागराज यांनी ‘मी स्वखुशीने आत्महत्या करीत आहे’ असे लिहिले होते.
चिठ्ठी वाचून पत्नीने तत्काळ पती नागराज यांना फोन केला, मात्र तो बंद लागत होता. नातेवाईकांकडे चौकशी केली मात्र काहीच पत्ता लागत नव्हता. पत्नीने सायंकाळी जोडभावी पेठ पोलीस ठाणे गाठले व पती सकाळपासून बेपत्ता असल्याचे सांगितले. पोलिसांनी तक्रार घेतली, शेवटचा कॉल तपासला असता, विजापूर रोडवर झाल्याचे समजले. मात्र शनिवारी सकाळी धुळखेड ब्रिज येथील भीमा नदीच्या बंधाºयात समर्थ याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. दुपारी १.३0 वाजण्याच्या सुमारास नागराज यांचा मृतदेह आढळून आला.
नागराज कनाळे यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. आत्महत्या केली खरी मात्र ती लहान मुलाला सोबत घेऊन का केली हाही मोठा प्रश्न स्थानिक नागरिकांना पडला आहे.
सध्याच्या तपासात नागराज कनाळे यांनी आत्महत्या का केली? याचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणी झळकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होईल, त्यानंतर पोलीस तपास करतील. आम्हीही आमच्या परीने तपास करीत आहोत, सत्य बाहेर येईल.
- शिवशंकर बोंदर,
पोलीस निरीक्षक, जोडभावी पेठ पोलीस ठाणे.