तारापूर भिमा नदीपात्रातील होडी तुटल्याने बुडून एकाचा मृत्यू, ११ जण वाचले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 02:10 PM2017-11-06T14:10:36+5:302017-11-06T14:11:07+5:30
आॅनलाइन लोकमत सोलापूर
चळे/सुस्ते दि ६ : तारापूर (ता़ पंढरपूर) येथे भीमा नदीपात्रात होडी पलटी होऊन झालेल्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला तर तीन वर्षांच्या बालकासह ११ जण वाचले़ अनिल अंकुश शिंदे (वय २६, रा़ तारापूर) असे बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे़
चळे येथील विलास बाळू गायकवाड यांच्या घरी चळेसह आंबे व तारापूर या तीन गावच्या दर्लिंग देवाच्या वालगी मंडळांचा कार्यक्रम होता़ या कार्यक्रमासाठी तीनही गावांतील वालगी मंडळाचे तरुण चळे येथे आले होते़ दर्लिंग मंडळाचा वालग्याच्या कार्यक्रम झाल्यानंतर दुपारी ३़३० च्या सुमारास तारापूर येथील वालगी मंडळाचे तरुण परत गावी जाण्यासाठी भीमा नदीपात्रातून होडीतून जात होते़ बायडाबाई भोई, लताबाई भोई या दोन महिला होडी चालवित होत्या़ होडी मध्यभागी आली असता ती अचानक तुटली़ त्यात गोपाळ शिंदे, जगन्नाथ कांबळे, सचिन पाटील, वैभव वाघमोडे, बबलू पाटील, काका वाघमोडे, अनिल शिंदे, राजू घोरपडे, शशिकांत शिंदे यांच्यासह तीन वर्षांचा बालक होता़ होडी तुटल्यानंतर काहीजण पोहून बाहेर निघाले़ काका वाघमोडे यांनी दोन महिलांना व तीन वर्षांच्या मुलाला वाचविले़
दरम्यान, घटनेची माहिती कळताच तारापूर येथील ग्रामस्थांनी चार होडीच्या सहाय्याने भीमा नदीपात्रात बापू भोई, संजय भोई या होडी चालकांनी ग्रामस्थांच्या मदतीने शोध मोहीम सुरू केली़ सायंकाळी ६़३० वाजण्याच्या सुमारास काकासो निंगदेव वाघमोडे व गोरख वाघमोडे यांना अनिल शिंदे याचा मृतदेह आढळून आला़
मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदन करण्यासाठी पंढरपूरला नेण्यात आला आहे़ अनिल शिंदे याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, तीन बहिणी असा परिवार आहे़