कोरोनामुळे सोलापूरच्या महापौरांसह पदाधिकारी घरातच करणार विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 02:52 PM2020-08-29T14:52:18+5:302020-08-29T14:54:54+5:30
कोरोनाला रोखणार : मनपात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची बैठक
सोलापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी आपल्या घरातील गणेश मूर्तींचे पर्यावरणपूरक आपल्या घरीच विसर्जन करण्याचा निर्णय महापौर श्रीकांचना यन्नम यांच्यासह मनपातील पदाधिकाºयांनी घेतला आहे. शहरातील नागरिकांनी याच पद्धतीने विसर्जन करावे, असे आवाहन महापौरांनी केले.
या पार्श्वभूमीवर महापालिकेत शुक्रवारी सायंकाळी मध्यवर्ती गणेश मंडळांच्या पदाधिकाºयांची महापौरांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. मनपा आयुक्त पी. शिवशंकर, अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, उपमहापौर राजेश काळे, सभागृह नेते श्रीनिवास करली, नगरसेवक नागेश वल्याळ, सुभाष शेजवाल, उपायुक्त अजयसिंह पवार, सहा.आयुक्त श्रीराम पवार, विक्रमसिंह पाटील, नगर अभियंता संदीप कारंजे यांची प्रमुख उपस्थिती होती.
महापौर यन्नम म्हणाल्या, घरगुती गणेश मूर्तींचे घरातच पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन करावे. आम्ही नगरसेवकांनाही याबाबत आवाहन करणार आहोत. सभागृह नेते श्रीनिवास करली यांनीही आपल्या घरीच विसर्जन करणार असल्याचे सांगितले. यावेळी विविध मंडळांच्या पदाधिकाºयांनी सूचना केल्या. मनपाने विधिवत विसर्जन करावे, अशी मागणी केली. यावेळी सार्वजनिक मध्यवर्ती मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
मनपा खाणींमध्ये विसर्जन
मनपाच्या सर्व विभागीय कार्यालयांच्या क्षेत्रामध्ये गणेश मूर्ती संकलित करण्याची ठिकाणे निश्चित केली आहेत. गणेश मंडळांनी विभागीय कार्यालयांशी संपर्क करावा. गणेश मूर्ती त्या ठिकाणी सुपूर्द कराव्यात. सर्व गणेश मूर्ती संकलित केल्यानंतर महापालिकेच्या मालकीच्या मंठाळकर वस्ती येथील खाणीमध्ये विसर्जित करण्यात येतील.
घरीच करा विसर्जन, सेल्फी पाठवा ‘लोकमत’ला
गणेश मूर्तींचे आपल्या घरी पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन करणाºया नागरिकांनी एक सेल्फी काढून ‘लोकमत’ला व्हॉट्सअॅपवर पाठवावा. हा सेल्फी लोकमतच्या अंकात प्रसिद्ध करण्यात येईल. गणेशभक्तांनी आपले नाव आणि सेल्फी ९५४५४४४८०७ व्हॉट्सअॅप क्रमांकावर पाठवावा.