संचारबंदीमुळे सोलापुरातील १० कोटींच्या टॉवेल्सची निर्यात होणार ठप्प...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 10:59 AM2020-07-13T10:59:10+5:302020-07-13T11:02:50+5:30
यंत्रमागाला फटका; अनलॉकनंतर आॅर्डर्स मिळू लागल्या; पण आता काम थांबवावे लागणार
सोलापूर : सोलापुरात १६ जुलैपासून दहा दिवसांची संचारबंदी लागू केल्यामुळे निम्म्या क्षमतेनेच का होईना; पण सुरू असलेला यंत्रमाग उद्योग आता बंद राहणार आहे. त्यामुळे विदेशातून मिळालेल्या दहा कोटी रुपयांच्या आॅर्डर्सनुसार उत्पादित केलेल्या टॉवेल्सची निर्यात ठप्प झाली आहे.
साडेतीन महिन्यांच्या लॉकडाऊननंतर अनलॉक झाले अन् यंत्रमाग उद्योग काहीअंशी सुरू झाला. अलीकडील काळात आखाती देश, युरोप, श्रीलंका आदी देशातून टॉवेल्सच्या आॅर्डर्स मिळू लागल्या. आजमितीस उद्योजकांच्या हातात १० कोटी रुपयांच्या आॅर्डर्स होत्या; पण संचारबंदीत शहरातील उद्योग बंद ठेवण्याचा आदेश असल्यामुळे हे काम पूर्ण करणे यंत्रमागधारकांना अशक्य होणार आहे.
सध्या फक्त चाळीस टक्केच उत्पादन सुरू आहे. कारखान्यातील कामाच्या वेळेत प्रचंड कपात केली आहे. काही उद्योजकांनी चार किंवा पाच दिवसांचा आठवडा जाहीर केला आहे. यामुळे टेक्स्टाईलमधील अर्थव्यवस्था कोलमडली आहे. कामगारांना पूर्ण क्षमतेने रोजगार मिळेना.
सोलापुरात जवळपास ८०० कारखानदार कार्यरत आहेत. जवळपास १३ हजार यंत्रमाग असून यातील फक्त आठ हजार यंत्रमाग सध्या सुरू आहेत. या उद्योगावर ४० हजार कामगार अवलंबून आहेत. यातील ६० टक्के कामगारांना सध्या पूर्ण क्षमतेने रोजगार मिळू लागला आहे. सोलापुरातील बहुतांशी कारखानदार विदेशी मार्केटवर देखील अवलंबून आहेत. येथील एक्सपोर्ट मार्केट खूप मोठा आहे. पण अलीकडच्या काळात एक्सपोर्ट व्यवसाय खूप कमी होऊ लागला. त्यात लॉकडाऊनचा जबरदस्त फटका एक्स्पोर्ट करणाºया टेक्स्टाईल उद्योजकांना बसला आहे. भविष्यात एक्स्पोर्ट व्यवसाय पुन्हा पूर्ण क्षमतेने सुरू होईल का ? याची शाश्वती नसल्याने बडे उद्योजक चिंताग्रस्त आहेत.
सर्वाधिक फटका कामगारांना
लॉकडाऊन पूर्णपणे संपलेला नाही. त्यामुळे सर्वच क्षेत्रातील व्यापारी पेठा, दुकाने शंभर टक्के पूर्वपदावर आली नाहीत. त्यामुळे आपसूकच देशांतर्गत तसेच विदेशी मार्केटमधून सोलापुरी टेक्स्टाईल उत्पादनांना पूर्वीप्रमाणे उठाव नाही. ज्या आॅर्डर स्वीकारल्या आहेत त्यांनाही आता पुरवठा करता येणार नाही. सर्वात मोठा उद्योग म्हणून टेक्स्टाईल उद्योगाची ओळख आहे. त्यामुळे सोलापुरातील टेक्स्टाईल उद्योग शंभर टक्के पूर्वपदावर यायला आणखीन वेळ लागेल. मार्केटचा अंदाज घेत उत्पादन घेत रहावे. पुढील काळात चांगले मार्केट निर्माण होईल. पुन्हा दहा दिवस संचारबंदी लागू झाल्याने यंत्रमागधारकांसोबत सर्वाधिक फटका कामगारांना बसणार आहे.
- पेंटप्पा गड्डम, अध्यक्ष : सोलापूर जिल्हा यंत्रमागधारक संघ, सोलापूर