दर घसरल्याने दूध उत्पादकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 01:12 PM2018-04-17T13:12:45+5:302018-04-17T13:12:45+5:30
सरकारची बघ्याची भूमिका, ऐन उन्हाळ्यात गाईच्या दुधाला मिळतो १८ रुपयांचा दर
सोलापूर: आतापर्यंत जानेवारीनंतर उन्हाळ्यात दूध खरेदीचे दर वाढत असत; मात्र यावर्षी एप्रिल महिन्यात दुधाचे दर आणखीन घसरुन १८ रुपयांवर आले आहेत. घसरणाºया दरामुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला असताना सरकार बघ्याची भूमिका घेत आहे.
आॅक्टोबरनंतर दूध संकलनात वाढ होते. जानेवारी अखेरपर्यंत दूध वाढीचा कालावधी असतो. फेब्रुवारीपासून दूध संकलन हळूहळू कमी होण्यास सुरुवात होते. मार्चनंतर दूध संकलनात मोठी घट होते. त्यामुळे मार्चनंतर दूध खरेदी दरात वाढ होण्यास सुरुवात होते. एप्रिल-मे- जून महिन्यात दूध खरेदी दर वाढल्याने शेतकºयांना चार पैसे मिळतात; मात्र यावर्षी मागील वर्षी जून महिन्यापासून दूध खरेदी दरात वरचेवर घसरण होत आहे.
जून महिन्यात खासगी दूध संकलन डेअºया गाईच्या दुधाला प्रतिलिटर २५ रुपयांचा दर देत होत्या. राज्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी याच महिन्यात गाईच्या दुधाला प्रतिलिटर २७ रुपये दर जाहीर केला. राज्यात खासगी दूध डेअºयांच्या ताब्यात दूध धंदा गेला आहे. जानकरांनी केलेली दूध खरेदी दरवाढ खासगी संघांनी मान्य केली नाही. त्यानंतर वरचेवर दूध खरेदी दर कमी करीत एप्रिल महिन्यात १८ रुपयांवर दर आले. राज्यात विशेषत: पश्चिम महाराष्टÑात दूध संकलन मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. अतिरिक्त दुधाचा प्रश्न निर्माण झाल्याने दुधाचे दर घसरत असल्याचे सांगितले जाते.
गतवर्षी होता २७ रुपये दर
सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाचे मागील १० वर्षांतील एप्रिल महिन्यातील गाईच्या दुधाचे खरेदी दर कमी अधिक झाले असले तरी यावर्षी दरात मोठी घसरण झाली आहे. २००८ मध्ये ११ रुपये २५ पैसे. २००९ मध्ये १० रुपये ५० पैसे. २०१० मध्ये १४ रुपये. २०११ मध्ये १६ रुपये, २०१२ मध्ये १७ रुपये. २०१३ मध्ये १७ रुपये., २०१४ मध्ये २४ रुपये., २०१५ मध्ये १८ रुपये., २०१६ मध्ये २० रुपये. २०१७ मध्ये २७ रुपये व २०१८ मध्ये १८ रुपये.
तर दर घसरतीलच..
- दरवर्षी जानेवारीनंतर दुधाचे दर वाढत असतात. याप्रमाणे याहीवर्षी दर वाढतील या अपेक्षेने शेतकरी दर वाढीकडे डोळे लावून जनावरांचे संगोपन करीत आहेत; मात्र वरचेवर दुधाचे दर कमी-कमी होत आहेत. या व पुढील मे महिन्यातही शासनाने लक्ष दिले नाही तर दर घसरतील असे सांगितले जाते.