प्रशासनाच्या उदासीनतेमुळे सोलापूर जिल्ह्यातील शिक्षकांचा पगार लांबणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 02:43 PM2018-07-20T14:43:34+5:302018-07-20T14:45:16+5:30
सोलापूर जिल्हा परिषद : जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचा आरोप
सोलापूर : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या उदासीनतेमुळे जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचा पगार लांबणीवर पडत असल्याचा आरोप जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष शिवानंद भरले यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी झेडपी अध्यक्ष संजय शिंदे, सीईओ डॉ. राजेंद्र भारुड यांना निवेदन दिले आहे.
भरले यांनी निवेदनात म्हटले आहे, सध्या शासनाची शालार्थ वेतन प्रणाली बंद पडली आहे. गेली चार महिने आॅफलाईन पद्धतीनेच पगार काढला जात आहे. आॅफलाईन पगार काढण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनाच्या हाती आहे. गेल्या चार महिन्यांपासून २० तारखेच्या आत कधीच पगार झालेला नाही. त्यामुळे रुग्ण शिक्षकांचे अतोनात हाल होत आहेत. शिवाय शिक्षकांच्या घरबांधणी कर्जाचे हप्ते तटल्याने त्यांना दंड सोसावा लागत आहे. शिक्षकांच्या पगार लांबणीवर पडण्यास कारणीभूत असणाºया कर्मचाºयांवर कारवाई करण्यात यावी. यावेळी वीरभद्र यादवाड, सूर्यकांत हत्तुरे, रेवणसिद्ध हत्तुरे आदी उपस्थित होते.
बदल्यांच्या कामामुळे तालुकास्तरावरुन शिक्षकांच्या वेतन मागण्या उशिरा आल्या. एका तालुक्यातून गट विम्याची मागणीही चुकीची आली. ती दुरुस्त करण्यास वेळ लागला. उद्यापर्यंत सर्व प्रकारच्या त्रुटी दूर होतील आणि शनिवार किंवा सोमवारपर्यंत शिक्षकांचा पगार होईल.
-संजयकुमार राठोड,
शिक्षणाधिकारी, प्राथमिक विभाग