सोलापूरला अवकाळी पावसाने झोडपले, शेतीपिकांचे नुकसान
By admin | Published: March 15, 2017 05:44 PM2017-03-15T17:44:57+5:302017-03-15T18:37:08+5:30
सोलापूरला अवकाळी पावसाने झोडपले, शेतीपिकांचे नुकसान
सोलापूरला अवकाळी पावसाने झोडपले, शेतीपिकांचे नुकसान
सोलापूर : सकाळपासून ढगाळ हवामानामुळे चिंतेत असलेल्या व वाढत्या उन्हाचा चटका सहन करणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, मंगळवेढा, मोहोळ, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट सह अन्य तालुक्याला बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास अवकाळी पावसाने झोडपले़ विजेच्या कडकडाटासह पडलेल्या पावसामुळे शेतीपिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले़
दरम्यान, बुधवारी सायंकाळी दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे, मंद्रुप, तैरामैल, अक्कलकोट तालुक्यातील हालहळ्ळी, चिंचोळी, कुंभारी आदी परिसरात पावसाने चांगला तडाखा दिला़ यावेळी विजेच्या कडकडाट जोरात सुरू होता़ त्यामुळे नागरिक भयभीत झाले होते़ या पावसामुळे सुगीचा फेरा थांबला असून अनेक पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे़
उन्हाचा कडाका सुरू झालेल्या सोलापूरला बुधवारी मुसळधार पावसाने झोडपले. सकाळपासून शहर व परिसरात ढगाळ वातावरण दिसून येत होते़ त्यामुळे आज पाऊस पडणार की काय अशी शक्यता वर्तविण्यात येत होती़ अखेर सायंकाळी पाचच्या सुमारास पावसाने हजेरी लावली़ यामुळे द्राक्ष, ज्वारी, गहु, हरभरा आदी पिकांना चांगलाच फटका बसला आहे़ पावसाच्या सरींमुळे उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट होते. मात्र गेल्या वर्षी दुष्काळग्रस्त सोलापूरवर मेहरबान झालेल्या पावसाने सरासरीपेक्षाही जास्त हजेरी लावली. आता उन्हाळ्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. चांगला पाऊस पडल्याने परिसरात गारवा निर्माण झाला होता.