दुष्काळग्रस्त सोलापूर जिल्ह्यातील बारा गावांची तहान भागतेय आठ टँकरवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 12:12 PM2019-01-04T12:12:53+5:302019-01-04T12:13:46+5:30
सोलापूर : दुष्काळी परिस्थितीमुळे ऐन थंडीच्या दिवसातच ग्रामिण भागात पिण्याच्या पाण्याचा ठणठणाट निर्माण झाला आहे. गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी गावात ...
सोलापूर : दुष्काळी परिस्थितीमुळे ऐन थंडीच्या दिवसातच ग्रामिण भागात पिण्याच्या पाण्याचा ठणठणाट निर्माण झाला आहे. गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी गावात पाणीच उपलब्ध नसल्याने सध्या १२ गावातील नागरिकांना ८ टँकरच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पाणी देण्यात येत आहे. इंधनाच्या दरात गत पाच वर्षात सातत्याने वाढ झाल्याने टँकर वाहतूकदारास पाणीपुरवठा करण्यासाठी प्रतीकिलोमीटरसाठी २७0 रुपये इंधन अनुदान देण्यात येत आहे.
जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी टँकर देण्यापुर्वी विविध उपाय योजना करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. शेवटचा पर्याय म्हणून अपरिहार्य परिस्थितीतच टँकरने पाणीपुरवठा करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात येत आहे.
राज्य शासनाने २९ नोव्हेंबर रोजी शासन निर्णय काढून दुष्काळी तालुक्यांची यादी जाहीर केली आहे. पूर्वी टँकर मंजूरीचे अधिकार जिल्हाधिकारी यांच्याकडे होते. मात्र दुष्काळी परिस्थितीमुळे टंचाईत त्वरीत उपाय योजना करण्यासाठी टँकर मंजूर करण्याचे अधिकार उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी यांना देण्यात आला आहे.
टँकर मंजूर करण्यापूर्वी गावातील विहीर, विंधन विहीर अधिग्रहण करणे, नळ योजनांची विशेष दुरुस्ती करण्यात यावी. बंद प्रादेशिक योजना कार्यान्वित करण्यासाठी तेथून पाणीपुरवठा करणे शक्य आहे का याची पडताळणी करण्याच्या सूचनाही शासनाने प्रशासनास दिले आहेत.
अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, मंगळवेढा, मोहोळ, पंढरपूर, सांगोला, करमाळा, माढा माळशिरस या तालुक्याचा समावेश दुष्काळी तालुका यादीत करण्यात आला आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील शेळगी, तिºहे, मार्डी, वडाळा व बार्शी तालुक्यातील आगळगांव, वैराग, उपालेडू, गौडगांव, पांगरी, पानगांव, नारी, सुर्डी, खांडवी या महसुली मंडळाचा समावेश दुष्काळी यादीत झाला आहे.
टँकरच्या पाण्यावर या गावांची भागतेय तहान
- माढा तालुक्यातील तुळशी, पडसाळी, जाधववाडी, भैरागवाडींना पाणीपुरवठासाठी चार टँकर सुरु आहेत. करमाळा तालुक्यातील पिसरे, पांडे, शेलगांव, धोटी साठी तीन टँकर तर सांगोला तालुक्यातील गळवेवाडी, इटकी, यलमार मंगेवाडींना गावाला एक टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे.