सोलापुर जिल्ह्यातील दुष्काळी प्रस्तावात ‘बार्शी, उत्तर’चं चांगभलं !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 04:53 PM2018-10-23T16:53:33+5:302018-10-23T16:55:36+5:30
तुळशीची टँकरसाठी मागणी : सत्यमापन अहवालानुसार पिकांचे ५० टक्के नुकसान
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील यंदा अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाल्याने सर्वत्र पाणीटंचाई, चाराटंचाई जाणवते. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने नऊ तालुक्यांचा प्रस्ताव दुष्काळासाठी पाठविण्यात आला आहे. तर उत्तर व बार्शी तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा म्हणून प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक यांनी १० टक्के गावांमध्ये केलेल्या सत्यमापन अहवालानुसार जिल्ह्यात पिकांचे ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचे समोर आले होते. सोलापूर जिल्ह्यात यावर्षी ४० टक्क्यांपर्यंतच पाऊस पडला. यामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. सर्वच तालुक्यात सरासरी पर्जन्यमानात घट झालेली आहे.
जिल्ह्यातील नऊ तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांकडे यापूर्वीच प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. तर जिल्ह्याची पाणीपातळी २.२८ मीटरने खालावल्याचे जिल्हाधिकारी भोसले म्हणाले. भूवैज्ञानिकांच्या अहवालानुसार आॅक्टोबर ते डिसेंबर ३०६ गावे, तसेच जानेवारी ते मार्च १६० गावे तर एप्रिल ते जून दरम्यान १४१ गावे असे एकूण ६६० गावात पाणीटंचाई जाणवणार आहे.
टँकरचा पहिला प्रस्ताव
माढा तालुक्यातील तुळशी गावात टँकरने पाणीपुरवठा करावा, असा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे आला आहे. खासगी टँकरसाठी निविदा काढण्यात आल्याचे जिल्हाधिकारी भोसले यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे शासकीय २९ टँकर आहेत. तुळशी गावाची लोकसंख्या सहा हजार आहे. गावात सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई आहे. पुरवठा करणाºया विहिरीला अत्यल्प पाणी आहे. तसेच वळसंग गावाला टँकरने पाणीपुरवठा करावा, यासाठी प्रशासनाकडे निवेदन आले आहे.
दुष्काळ जाहीर झाल्यावर सवलती
- शासनाने सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर केल्यावर विद्यार्थ्यांची फी माफ, वीजबिले माफ, सक्तीची वसुली होणार नाही. तहसीलदारांना टँकरचे अधिकार, अशा विविध प्रकारच्या सवलती मिळणार आहेत.
त्या दोन तालुक्यांचा अहवाल पाठविला
- दुष्काळी तालुक्यातून बार्शी आणि उत्तर सोलापूर तालुक्याला वगळण्यात आले होते. आता दोन तालुक्यात पीक परिस्थिती चांगली नाही. तसेच त्या दोन तालुक्यांत विशेष बाब म्हणून दुष्काळ जाहीर करावा, असा प्रस्ताव पाठविण्यात आला. त्यावर शासनस्तरावर निर्णय होणार असल्याचे जिल्हाधिकारी भोसले यांनी सांगितले. तसेच दुष्काळी परिस्थितीवर बुधवारी पुण्यात बैठक होणार आहे.