दुष्काळाची दाहकता; पाणवठ्यात दगड टाकून पाण्याचा केला फुगवटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 12:30 PM2019-05-16T12:30:58+5:302019-05-16T12:32:51+5:30
नान्नज येथील माळढोक अभयारण्यातील वनपर्यवेक्षक वन्यप्राण्यांची भागवत आहेत तहान
वडाळा : सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्यामुळे यंदा सोलापूर जिल्ह्यात सर्वत्र दुष्काळाची दाहकता दिसून येत आहे़ पाण्यासाठी रानोमाळ फिरणाºया ग्रामस्थांना पिण्याचे पाणी हे सुद्धा अमृत वाटू लागले आहे़ दुष्काळात पशुपक्ष्यांसह प्राण्यांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी नान्नज (ता़ उ़ सोलापूर) येथील अभयारण्यातील वनपर्यवेक्षकांनी माळढोक क्षेत्रात ठिकठिकाणी पाणवठे निर्माण करून प्राण्यांची तहान भागविण्याचा प्रयत्न केला आहे.
उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज येथे दुर्मिळ अशा माळढोक पक्ष्यांचे अभयारण्य आहे. या अभयारण्यात विविध प्रकारचे पशु, पक्षी, प्राणी गुण्यागोविंदाने राहतात; मात्र मागील काही वर्षापासून या भागात पडणाºया कमी पर्जन्यमानामुळे माळढोक अभयारण्य परिसरात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे.
पशुपक्ष्यांसह प्राण्यांची पाण्यावाचून होणारी तडफड व घशाला पडलेली कोरड, तहान भागविण्यासाठी वनपर्यवेक्षकांनी माळढोक परिसरात ठिकठिकाणी पाणवठे निर्माण केले आहेत़ या पाणवठ्यात कुठे टँकरव्दारे तर कुठे हातपंपातील पाण्याने पाणीपुरवठा करून पाणवठे भरून घेतले जातात.
उत्तर सोलापूर तालुक्यात कोणत्याही प्रकारचे पाण्याचे स्रोत नसल्यामुळे व पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे दुष्काळजन्य परिस्थितीमुळे पाण्याची पातळी खूपच खोल गेली आहे. वाढत्या उष्णतेमुळे जंगलातील वृक्षांची ही पूर्णत: पानगळ झाली व जंगलातील असलेले गवतही पूर्ण वाळून गेले़ त्यामुळे वन्य प्राणीचाºयासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी इकडे-तिकडे सैराट फिरू लागले आहेत.
माळढोकच्या वनपर्यवेक्षकांनी वन्य प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी सोलापूर बार्शीरोड लगत असलेल्या अभयारण्यातील नागनाथ मंदिराजवळील पाणवठ्यांमध्ये हात पंपाने पाणी सोडले, परंतु पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे पंपाला पाणी कमी येऊ लागले़ त्यामुळे वन्य प्राण्यांची तहान भागविण्यासाठी पाणवठ्यांमध्ये जेवढे हात पंपाने सोडता येईल तेवढे पाणी खेचून त्यामध्ये सोडले परंतु पाणवठा पूर्ण न भरता त्यामध्ये निम्म्याभागात दगड अंथरून पाण्याचा फुगवटा करुन वन्य प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय केली.