दुष्काळाची दाहकता; फळबागा वाचविण्यासाठी टँकरदारे पाणीपुरवठा
By appasaheb.patil | Published: April 10, 2019 02:09 PM2019-04-10T14:09:22+5:302019-04-10T14:09:58+5:30
दक्षिण सोलापूर तालुक्यातील बंकलगी परिसरातील शेतकरी आपल्या शेतातील फळबागा वाचविण्यासाठी पैसे देऊन टँकरने पाणीपुरवठा करून बागा वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
सोलापूर : मागील तीन वर्षांपासून दुष्काळाचा सामना करणाºया दक्षिण तालुक्याला यंदाही ग्रहण लागले आहे़ पुरेशा पाण्याअभावी जळून चाललेल्या फळबागांना शेतकºयांकडून टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची भीषण वास्तवता बंकलगी (ता़ दक्षिण सोलापूर) परिसरात दिसून येत आहे़.
दक्षिण तालुक्यातील बंकलगी येथे आंबा, द्राक्ष, लिंबू, बोर, पेरू यासह वेगवेगळ्या फळबागांची अंदाजे शंभर एकर लागवड करण्यात आली आहे. त्यापैकी सर्वाधिक फळबागा लागवड ही द्राक्ष व लिंबूची आहे.
सोलापूर जिल्ह्यात यावर्षी वार्षिक सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला, शिवाय पावसाने ऐनवेळी दगा दिल्याने खरीप पिकांचे नुकसान झाले. रब्बी हंगामही हातचा गेला. फळबागांवरही पाणीटंचाईचे संकट आहे. एकीकडे गावागावांतील शेतकरी भीषण दुष्काळाने हवालदिल झाला आहे. उपलब्ध पाणी ठिबक सिंचनाद्वारे फळबागांना देऊन बागा वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न शेतकरी करीत आहेत. दुसरीकडे अन्नपाण्याच्या शोधात निघालेली रानडुकरे आणि नीलगायी धुमाकूळ घालत आहेत.
एनटीपीसी परिसरातून मिळतेय पाणी
- एनटीपीसी या वीजनिर्मिती करणाºया कंपनी परिसरात तीन मोठमोठे स्टोअरेज टँक उभे करण्यात आले आहेत. त्याधील लाखो लिटर पाणी दररोज जमिनीत मुरते़ याचा फायदा परिसरातील शेतकºयांच्या विहिरींना होऊन विहिरीचा पाणीसाठा वाढला आहे़ हे पाणी संबंधित शेतकरी अंदाजे पाच हजार लिटरची गाडी पाचशे रुपयासविकत असल्याचे शेतकºयांनी सांगितले़
आमच्या शेतात ३०० हून अधिक लिंबाची झाडे आहेत़ गेल्या सहा महिन्यांपासून शेतात पाणी नसल्याने बाग वाचविण्यासाठी एनटीपीसी परिसरातून विकतचे पाणी आणावे लागत आहे़
- राजकुमार दशवंत, बंकलगी
गेल्या पाच महिन्यांपासून आम्ही एनटीपीसी परिसरातून बारा हजार लिटरसाठी पंधराशे रुपये देऊन पाणी मागवित आहोत़ फळबागा जोपासताना शेतीच्या खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे़
- नागप्पा कोणदे, शेतकरी