मुदतवाढीमुळे सहकारी संस्थांचे पदाधिकारी अडचणीत?
By admin | Published: May 31, 2014 12:25 AM2014-05-31T00:25:04+5:302014-05-31T00:25:04+5:30
जिल्ह्यातील १६४६ सहकारी संस्था; भाजपा-सेनेच्या लाटेमुळे होणार गोची
सोलापूर: निवडणूक सुधारणा कायद्याच्या अंमलबजावणीसाठीच्या नावाखाली सोलापूर जिल्ह्यातील मुदत संपलेल्या १२२८ व डिसेंबरमध्ये मुदत संपणार्या ४१८ सहकारी संस्थांच्या पदाधिकार्यांना मुदतवाढ मिळाली आहे. निवडणूक प्राधिकरणाच्या अधिपत्याखाली आता या संस्थांच्या निवडणुका होणार असून, राज्यात सेना-भाजपाच्या लाटेने सत्ताधार्यांची गोची होणार आहे. सहकार कायद्यामध्ये घटनादुरुस्ती झाली आहे. १९९७ च्या घटना दुरुस्तीनुसार आता सहकार खात्याच्या संस्थांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र निवडणूक प्राधिकरण स्थापन करण्यात आले आहे. कोणत्याही सहकारी संस्थांच्या निवडणुका आता प्राधिकरणाच्या अधिपत्याखाली होणार आहेत. प्राधिकरणाचे आयुक्त म्हणून सेवानिवृत्त सहकार आयुक्त मधुकरराव चौधरी यांची नियुक्ती शासनाने केली आहे. त्यांची नुकतीच नियुक्ती झाल्यानंतर आता राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील ३१ डिसेंबर २०१३ मध्ये मुदत संपणार्या सहकारी संस्थांच्या संचालक मंडळाला राज्य शासनाने मुदतवाढ दिली आहे. घटना दुरुस्तीच्या कारणामुळे राज्य शासनाने मुदत संपणार्या संस्थांच्या पदाधिकार्यांना मुदतवाढ दिली आहे. मुदतवाढ दिली नसती तर कदाचित काँग्रेस-राकाँच्या ताब्यात संस्था राहिल्या असत्या. आता राज्यात सत्ता बदलाचे वारे वाहू लागल्याने अनेक संस्थांवर सत्ताबदलाची भीती आहे.
------------------------
सत्ताधार्यांची झाली गोची
राज्यातील बहुतेक सहकारी संस्थांवर सत्ताधारी काँग्रेस-राकाँचे वर्चस्व आहे. या संस्थांच्या निवडणुका ज्यांच्या त्यांच्या सोईने होत असत. काही संस्थांच्या निवडणुका जिल्हा उपनिबंधक, काहींच्या तालुका निबंधकांच्या नियंत्रणाखाली, काही संस्था निवडणुकीसाठी मर्जीतील अधिकारी नेमत असत, काहींच्या निवडणुका गुपचूप उरकल्या जात असत. या नव्या निवडणूक सुधारणा कायद्यान्वये प्राधिकरण स्थापन झाले आहे. प्राधिकरणाच्या नावाखाली सहकारी संस्थांना मुदतवाढ देण्यात आली खरी परंतु सध्या राज्यात भाजपा-सेनेची लाट असल्याने निवडणुका झाल्या तर सत्ताधारी अडचणीत येण्याची शक्यता आहे.
----------------------------------
डिसेंबर २०१३ अखेर मुदत संपलेल्या संस्था सोलापूर शहर- ८१, उत्तर सोलापूर- २३, दक्षिण सोलापूर-७५, अक्कलकोट-९२, बार्शी-५६, मोहोळ-१००, पंढरपूर-११३, मंगळवेढा-२५९, सांगोला-२३३, माढा-७३, करमाळा-३०, माळशिरस-९३ एकूण- १२२८ डिसेंबर १४ अखेर मुदत संपणार्या संस्था सोलापूर शहर- १००, उत्तर सोलापूर- ३, दक्षिण सोलापूर-८०, अक्कलकोट-२०, बार्शी-५१, मोहोळ-१५, पंढरपूर-५, मंगळवेढा-२४, सांगोला-००, माढा-१४, करमाळा-३८, माळशिरस-६८ एकूण- ४१८