भुकटी दरवाढीमुळे राज्यातील दूध अनुदान योजना गुंडाळली ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 02:41 PM2019-02-05T14:41:04+5:302019-02-05T14:42:39+5:30
सोलापूर : दूध भुकटीच्या दरात वाढ झाल्यामुळे झाल्यामुळे राज्य सरकार दुधाला प्रतिलिटर पाच रूपये अनुदान देण्याची योजना गुंडाळण्याच्या ...
सोलापूर: दूध भुकटीच्या दरात वाढ झाल्यामुळे झाल्यामुळे राज्य सरकार दुधाला प्रतिलिटर पाच रूपये अनुदान देण्याची योजना गुंडाळण्याच्या तयारीत असून, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी तसा प्रस्ताव तयार केला असल्याचे सांगण्यात आले.
राज्यात गाईच्या दुधाच्या दरात मोठी घसरण झाल्याने शेतकरी अडचणीत आला. ही बाब लक्षात घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्यासाठी आंदोलन केल्यानंतर शासनाने अनुदान देण्याचे जाहीर केले. १ आॅगस्ट २०१८ पासून गाईच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान जाहीर केले. हे अनुदान तीन (आॅगस्ट, सप्टेंबर व आॅक्टोबर) महिन्यासाठी दिले जाणार होते. केवळ भुकटीसाठी वापरल्या जाणाºया अतिरिक्त दुधालाच हे अनुदान दिले जात आहे. तीन महिन्यांची मुदत संपल्यानंतरही दूध भुकटीचे दर सुधारले नसल्याने दुधाच्या दरात वाढ झाली नाही. त्यामुळे पशुसंवर्धन व दुग्ध विकास खात्याने अनुदानासाठी तीन (नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी) महिन्याची मुदतवाढ दिली.
आॅगस्ट ते आॅक्टोबर या तीन महिन्यांचेही संपूर्ण अनुदान अद्याप शेतकºयांपर्यंत पोहोचले नाही. दर महिन्याला साधारण ९० कोटी रुपये अनुदानासाठी द्यावे लागतात. तीन महिन्याचे (आॅगस्ट ते आॅक्टोबर) साधारण २७० ते २८० कोटी रुपये देय होते. त्यापैकी २५० कोटी रुपये दिले असल्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी सांगितले.
नोव्हेंबर ते जानेवारी या तीन महिन्याच्या अनुदान वितरणासाठी अर्थ खात्याची मान्यता आवश्यक आहे; मात्र दुग्धविकास खात्याच्या अनुदान मागणीला अर्थखात्याने अद्याप मान्यताच दिली नसल्याचे सांगण्यात आले. असे असताना दूध भुकटीच्या दरात वाढ झाली असल्याने अनुदानच बंद करण्याचा विचार राज्य शासन करीत आहे. याबाबत दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी तसा प्रस्ताव असल्याचे सांगितले.
२५आॅक्टोबरपर्यंतचे अनुदान मिळाले आहे. राज्यभरातील शेतकºयांचे शासनाकडे अनुदानाचे ४०० कोटी रुपये अडकले आहेत. ही मोठी रक्कम शासनाने लवकर द्यावी. दूध पावडरीच्या दरात ४० ते ५० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे दिले जाणारे प्रतिलिटर पाच रुपये मिळणार की बंद होणार हे माहीत नाही.
-दशरथ माने
अध्यक्ष, महाराष्टÑ मिल्क असोसिएशन
दूध पावडरीचे दर कमी झाल्याने पावडरीसाठीच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान दिले जात आहे. बाजारात पावडरीचे दर १४० वरुन १९० रुपयांपर्यंत वाढले आहेत. अनुदान योजनेची सहा महिन्यांची मुदत संपल्याने आता अनुदान योजना बंद करण्याचा विचार आहे. तसा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवला जाईल.
- महादेव जानकर
पशुसंर्धन व दुग्धविकास मंत्री