इंधन दरवाढीमुळे वाहनांच्या किमती वाढण्याची चिन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 01:16 PM2018-05-23T13:16:36+5:302018-05-23T13:16:36+5:30
सोलापूर : वाहन खरेदीचा विचार असेल तर घाई करा, कारण इंधन दरवाढीमुळे लवकरच चारचाकी वाहनांच्या किमतीत दोन टक्के वाढ करण्याच्या हालचाली कंपन्यांनी सुरू केल्या आहेत.
इंधन दरवाढीमुळे चारचाकी वाहनांचे सुटेभाग व इतर बाबींच्या खर्चात वाढ झाली आहे. याशिवाय उत्पादन खर्च वाढला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात वाहनांच्या किमतीत दीड ते दोन टक्का वाढ केल्याशिवाय पर्याय नाही असे वाहन कंपन्यांनी वितरकांना कळविले आहे. त्यामुळे स्टॉकमधील वाहने प्रचलित किमतीत विकावीत. लवकरच दरवाढ कळविली जाईल असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे वितरकांमध्ये गडबड सुरू झाली आहे. यामध्ये दुचाकी वाहनांच्या किमतीत अल्पशी वाढ होईल; मात्र चारचाकी व मालवाहू वाहनांच्या किमतीत मोठा फरक येणार आहे. छोट्या कार पाच हजारांपासून पंचवीस हजारांपर्यंत महागण्याची चिन्हे आहेत. तर मालवाहू वाहनाच्या किमतीत ५ हजारांपासून ३५ हजारांपर्यंत वाढ असणार आहे.
वाहनांच्या किमती वाढल्या की त्याप्रमाणे आरटीओचा कर वाढविला जातो. वाहनांच्या शोरुमच्या किमतीवरील हा कर आकारला जातो. किंमत पंचवीस हजारांपर्यंत वाढल्यास आरटीओचा कर काही प्रमाणात वाढणार आहे. ही रक्कम छोटी असली तरी आरटीओ कार्यालयाच्या तिजोरीत वर्षाखेर ही वाढ मोठी ठरणार आहे. विशेष म्हणजे सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात १0 ते १२ रुपयांची तफावत आहे. पेट्रोल वाहने स्वस्त असतात. इंधनाच्या किमतीतील फरकाचा विचार करता नागरिकांचा पेट्रोलची वाहने खरेदी करण्याकडे कल वाढल्याचे दिसून येत आहे.
वाहनाच्या एक्सशोरुमच्या किमतीवर आरटीओचा कर लावला जातो. वाहन कंपन्यांनी किमतीत वाढ केल्यास करात थोडा फरक पडेल.यामुळे आरटीओच्या महसुलात अल्पशी वाढ होईल यात शंका नाही.
- बजरंग खरमाटे,
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी