पावसाअभावी कृषी दुकानदार व्यवसायावर फिरले पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:15 AM2021-07-08T04:15:57+5:302021-07-08T04:15:57+5:30
खरीप हंगामासाठी मुबलक बियाणे, औषधे खरेदी करून ठेवली. यंदाच्या खरीप हंगामात चांगला व्यवसाय होईल, अशी आशा होती; मात्र पावसाअभावी ...
खरीप हंगामासाठी मुबलक बियाणे, औषधे खरेदी करून ठेवली. यंदाच्या खरीप हंगामात चांगला व्यवसाय होईल, अशी आशा होती; मात्र पावसाअभावी पेरणी लांबणीवर पडू लागल्याने कृषी दुकानदार हवालदिल झाला असून कृषी दुकानदार व्यवसायावर पाणी फिरले आहे.
कृषी व्यवसायावर वारंवार येणाऱ्या संकटांची झळ कृषी दुकानदारांनाही बसत आहे. मागील काही वर्षांपूर्वी दुष्काळ, अतिवृष्टी व सध्याची कोरोना महामारी, बँकांची पतपुरवठ्यात होणारी धरसोड यामुळे कृषी व्यवसायाची घडी विस्कटली आहे. यातच ग्रामीण वाड्यावस्तीवर नव्याने होत असलेली कृषी दुकाने यामुळे विभागला जाणारा ग्राहक यातच कृषी दुकानदारांसाठी शासनाच्या काही जाचक अटी पुढे येत आहेत. यामुळे कृषी दुकानदाराच्या खरिपातील व्यवसायावर यावर्षी पाऊस लांबल्यामुळे पाणी पडले आहे.
कृषी माल विक्रीच्या प्रतीक्षेत
कृषी दुकानदार व्यावसायिकांनी सध्या जमिनीतील पाण्याची स्थिती चांगली असल्यामुळे व काही ठिकाणी दमदार पावसाने हजेरी लावल्यामुळे भविष्यातील चांगल्या व्यवसायाची अपेक्षा करीत कीटकनाशक, बुरशीनाशक, सेंद्रिय खते, ड्रीपद्वारे दिली जाणारी खते, जैविक खते व औषधे, बाजरी, मका, कांदा, तूर, मूग, उडीदसह खरिपातील वेगवेगळ्या पिकांचे बियाणे असे लाखो रुपयांचे शेकडो टन बियाणे कृषी दुकानदारांनी विक्री करण्यासाठी कंपन्यांकडून खरेदी केले आहेत.
कोट :::::::::::::::::::
यंदाच्या खरिपासाठी कृषी दुकानदारांनी आवश्यक बियाणांचा साठा उपलब्ध केला होता. यातच लांबलेल्या पावसामुळे शेकडो टन बियाणे दुकानात पडून आहे. याबरोबर औषधे, खते या विक्रीवरही परिणाम होत असल्यामुळे सध्या कृषी दुकानदार संकटाच्या छायेत आहेत.
- भीमराव शेंडगे
अध्यक्ष, कृषी दुकानदार संघटना माळशिरस