लॉकडाऊनमुळे पालकांचा रोजगार गेला अन् जिद्दीने कवठेच्या दोघींनी मिळवली शिष्यवृत्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2022 06:00 PM2022-01-14T18:00:27+5:302022-01-14T18:00:33+5:30
जिल्हा परिषद शाळेचे यश : शाळा बंद असताना घरीच केला अभ्यास
सोलापूर : पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत कवठे जिल्हा परिषद शाळेतील सायली लोखंडे व सिद्धी जगताप या दोन विद्यार्थिनी राज्याच्या गुणवत्ता यादीत चमकल्या आहेत. लॉकडाऊनमुळे आपल्या वडिलांचे काम गेलेले असतानाही घरी अभ्यास करून या दोघींनी यश मिळविल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी कौतुक केले आहे.
पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तर सोलापूर तालुक्यातील सहा विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत. यातील चार शहरांतील, तर दोन ग्रामीण भागातील आहेत. कवठे जिल्हा परिषद शाळेतील सायली ब्रह्मदेव लोखंडे व सिद्धी संतोष जगताप या दोघींनी हे यश मिळविले आहे. गतवर्षी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे शाळा बंदच होत्या. त्यामुळे ऑनलाइन वर्ग सुरू होते. अशा स्थितीत या दोघींनी घरीच अभ्यास केला. अडचणीबाबत शिक्षकांशी वारंवार संपर्क केला. वर्ग शिक्षक उम्मणा बसाटे, सुरेश उटगीकर यांनी घरी जाऊन त्यांना मार्गदर्शन केले. यातील सायलीचे वडील चिंचोळी एमआयडीसीत कामाला होते. लाॅकडाऊनमुळे त्यांचे हातचे काम गेले. आईने शिवणकाम व किराणा दुकानावर घर चालविले.
सिद्धीचे वडील सेंटरिंगचे काम करतात. बांधकाम थांबल्याने रोजगार बंद झाला. त्यामुळे रोजगारासाठी पुण्याला जावे लागले. घरच्या या परिस्थितीला तोंड देत या दोघींनी जिद्दीने अभ्यास केला. शिष्यवृत्तीचा निकाल जाहीर झाला. यात जिल्हा परिषद शाळेतील पाच विद्यार्थी राज्याच्या गुणवत्ता यादीत चमकले. यात कवठ्याच्या या दोघी असल्याबद्दल विस्तार अधिकारी गोदावरी राठोड, केंद्र प्रमुख नबिलाल नदाफ, मुख्याध्यापक शांतप्पा हेगोंडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लक्ष्मण लवटे, सरदार शेख, संतोष वावरे यांनी त्यांचे अभिनंदन केले.
फोटो: