मराठा आरक्षणावरून आषाढीच्या पूजेवर सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 03:43 AM2018-07-22T03:43:39+5:302018-07-22T03:44:06+5:30
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्तात वाढ
पंढरपूर (जि. सोलापूर) : आषाढी यात्रा सोहळ्याची श्री विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी पंढरपुरात येत आहेत. मात्र, मराठा क्रांती मोर्चा, धनगर समाज यांसह विविध संघटनांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे आषाढी वारीवर आंदोलनाचे सावट आहे.
आषाढी एकादशी सोमवारी आहे. त्यासाठी श्रीसंत तुकाराम, श्रीसंत ज्ञानेश्वर या प्रमुख संतांच्या पालख्यांसह शेकडो दिंड्या व १० लाखांपेक्षा जास्त भाविकांचे पंढरपुरात आगमन होत आहे. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या आरक्षणाची अधिसूचना जाहीर करावी आणि मगच पंढरपुरात महापूजेसाठी यावे, असा आक्रमक पवित्रा मराठा क्रांती मोर्चाने घेतला आहे. तर धनगर समाजानेही आरक्षणाच्या मुद्द्यावर रान पेटविले आहे. कोळी समाजाने महादेव कोळी समाजाचा दाखला मिळावा, यासाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे. विविध वारकरी संघटनांनी मंदिर समिती व अन्य निर्णयाच्या विरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
या परिस्थितीमुळे यंदा पोलिसांचा बंदोबस्त जास्तच असून त्यांच्यावर मोठा ताण आला आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी राज्यासह पंढरपुरातही काही ठिकाणी बस तोडफोड, पुतळ्याचे दहन करणे, चक्काजाम, ठिय्या आंदोलन यासारखा पवित्रा घेतल्याने तणावाचे वातावरण आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून एसआरपीच्या तुकड्यांसह जादा पोलीस बंदोबस्त मागविला आहे.
मराठा समाजाच्या बहुतांश मागण्या पूर्ण केल्या असून उर्वरित मागण्यांसाठी शासन कटिबद्ध आहे. मुख्यमंत्र्यांना महापूजेसाठी विरोध करणे उचित नाही. - चंद्रकांत पाटील, महसूलमंत्री
मुख्यमंत्र्यांनी महापूजेचा हट्ट सोडावा
पोलीस, वारकरी व मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये तणावाचे वातावरण आहे़ आषाढी यात्रा भाविकांना त्रास न देता सुरळीत पार पाडायची असेल, तर मुख्यमंत्र्यांनी महापूजेचा हट्ट सोडावा व आपला दौरा रद्द करावा.
- आ़ भारत भालके