प्रशासकाच्या दुर्लक्षामुळे नगरपंचायतीचा कारभार ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:21 AM2021-04-13T04:21:05+5:302021-04-13T04:21:05+5:30
या नगरपंचायतीवर माळशिरसचे तहसीलदार जगदीश निंबाळकर यांची १० मार्च २०२१ रोजी नियुक्ती झाली आहे. तेव्हापासून ते आजअखेरपर्यंत महाळुंग-श्रीपूर नगरपंचायतीकडे ...
या नगरपंचायतीवर माळशिरसचे तहसीलदार जगदीश निंबाळकर यांची १० मार्च २०२१ रोजी नियुक्ती झाली आहे. तेव्हापासून ते आजअखेरपर्यंत महाळुंग-श्रीपूर नगरपंचायतीकडे फिरकलेच नाहीत.
महाळुंग येथून श्रीसंत तुकाराम महाराज पालखी मार्ग जात आहे. या मार्गाचे काम लवकरच सुरू होणार आहे. या मार्गात शेतकऱ्यांच्या जमिनी, घरे गेली आहेत. त्या शेतकऱ्यांना नगरपंचायतीकडून येणेबाकी नसल्याचा दाखला जोडणे अत्यंत गरजेचे आहे, परंतु दाखल्यासाठी नगरपंचायतीकडून शेतकऱ्यांची बाकी भरून घेतली जात नाही व दाखला दिला जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पैसे वेळेवर मिळणार नाहीत.
महाळुंग-श्रीपूर नगरपंचायतीमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोणतेही पैसे घ्यायचे नाहीत व त्याची पावतीही द्यायची नाही, असे प्रशासकाने तोंडी आदेश दिल्याने नगरपंचायतीमधील कामकाज पूर्णपणे बंद पडले आहे. त्यामुळे ३४ कामगारांपैकी पाणीपुरवठा विभाग व स्वच्छता विभाग याव्यतिरिक्त इतर सर्व कामगारांना नगरपंचायतीमध्ये बसून राहण्याची वेळ आली आहे. जर महाळुंग-श्रीपूर परिसराला होणारा सार्वजनिक पाणीपुरवठा काही अडचणीमुळे बंद पडल्यास कर्मचाऱ्यांना कोणतेही आदेश नसल्याने सार्वजनिक पाणीपुरवठा पूर्ववत होण्यासाठी मोठा त्रास होणार आहे.
महाळुंग-श्रीपूर परिसरात कोविडचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांची सर्व यंत्रणा बंद असल्याने त्याबाबत जनजागृतीचे कामही पूर्णपणे बंद पडले आहे.
याबाबत सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष घालून नगरपंचायतीचे कामकाज व व्यवहार सुरळीत करावेत, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
जन्म अन् मृत्यू दाखल्यांची नोंदच नाही
सर्वसामान्य ग्रामस्थांचे महत्त्वाच्या असलेल्या जन्म आणि मृत्यूच्या दाखल्यांबाबत जन्म अन् मृत्यू रजिस्टरला कोणतीही नोंद घेतली जात नाही. एका महिन्यात नगरपंचायतीकडे नाव नोंदणी झाली नाही तर सदर संबंधित ग्रामस्थांना कोर्टामार्फत नोंद करून घ्यावी लागणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांना जन्म व मृत्यूची नावनोंदणी मोठी जाचक व खर्चिक पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही नाव नोंदणी त्वरित सुरू करावी, अशी ग्रामस्थांमधून मागणी होत आहे.