सोलापूर जिल्ह्यातील मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार ग्रामपंचायतींच्या फेरफार नोंदींची झाडाझडती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 11:39 AM2018-02-17T11:39:52+5:302018-02-17T12:27:50+5:30
जिल्ह्यातील अनेक गावात आजही नोटरी, प्रतिज्ञापत्र आणि संमतीपत्राच्या माध्यमातून फेरफार नोंदी घेतल्या जात आहेत. यातून शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडतोय. लोकांची फसवणूकही वाढत आहे.
राकेश कदम
सोलापूर दि १७ : जिल्ह्यातील अनेक गावात आजही नोटरी, प्रतिज्ञापत्र आणि संमतीपत्राच्या माध्यमातून फेरफार नोंदी घेतल्या जात आहेत. यातून शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडतोय. लोकांची फसवणूकही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पाच हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीच्या फेरफार अभिलेखांची झाडाझडती घेण्यात येत आहे. यासंदर्भातील अहवाल २८ फेब्रुवारीपर्यंत सादर करण्याचे आदेश मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आले आहेत.
शहरांप्रमाणे ग्रामीण भागातही आता जमिनींचे कोट्यवधींचे व्यवहार होत आहेत. राष्ट्रीय महामार्ग किंवा गावातील मुख्य रस्त्यांच्या बाजूच्या व्यवहारात प्रचंड उलाढाल होते. ग्रामपंचायतीच्या फेरफार अभिलेखात ग्रामसभेच्या ठरावानुसार नोटरी दस्त, प्रतिज्ञापत्र, संमतीपत्रान्वये फेरफार नोंदणी घेतल्या जातात. यातून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडतो. पण नंतरच्या काळात अशा प्रकारचे व्यवहार शासकीय स्तरावर पूर्णपणे कायदेशीर मानले जात नाहीत. त्यामुळे सामान्य माणसांची फसवणूक होण्याची शक्यता असते. याला चाप बसावा यासाठी ग्रामपंचायत हद्दीतील फेरफार अभिलेखांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सर्व सहायक दुय्यम निबंधक (वर्ग २ व श्रेणी १) यांनी २८ फेब्रुवारीपर्यंत ग्रामपंचायतींचे फेरफार अभिलेख तपासून ग्रामसभेच्या ठरावान्वये घेण्यात आलेल्या फेरफार नोंदी, नोटराईज प्रतिज्ञापत्र, संमतीपत्रान्वये घेण्यात आलेल्या फेरफार नोंदी याची तपासणी करण्यास सांगण्यात आले आहे.
या नोंदीतून शासनाच्या महसुलाचे नुकसान झाले असल्यास त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश मुद्रांक जिल्हाधिकारी एस.एन. दुतोंडे यांनी दिले आहेत. या झाडाझडतीमुळे अनेक बेकायदेशीर व्यवहार उघडकीस येणार आहेत. शिवाय काही व्यवहारात दंड वसुलीमुळे शासनाला प्रचंड महसूल मिळणार आहे.
---------------------
होनसळ, तळेहिप्परग्याची तपासणी पूर्ण
उत्तर सोलापूर तालुक्यातील होनसळ आणि तळेहिप्परगा येथील फेरफार अभिलेखांची मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयाने नुकतीच तपासणी केली. यात होनसळमध्ये ४३ व्यवहार नोटरीद्वारे, २५ व्यवहार संमतीपत्राद्वारे, ४ व्यवहार वाटणीपत्राद्वारे झाल्याचे निदर्शनास आले. हे व्यवहार २०१४ ते २०१७ या कालावधीतील आहेत. येथे दंड वसुली करुन व्यवहार नियमित केले जातील. तळेहिप्परगा येथील तपासणी पूर्ण झाली असली तरी व्यवहारांची नेमकी माहिती उपलब्ध नसल्याचे कार्यालयातून सांगण्यात आले. ग्रामपंचायतींच्या हद्दीत अशाप्रकारचे व्यवहार झाले असतील तर तक्रार करावी, असे आवाहनही मुद्रांक कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
-------------------
महसूल बुडाल्यास ग्रामसेवकच जबाबदार
- ग्रामपंचायतीच्या फेरफार अभिलेखांच्या तपासणीबाबतचे पत्र जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना पाठविण्यात आले आहे. मुद्रांक शुल्क वसुलीसाठी ग्रामीण भागात ग्रामसेवकांना प्रॉपर आॅफिसर म्हणून नेमण्यात आले आहे. महापालिका आणि नगरपालिका हद्दीत आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी निश्चित केलेल्या अधिकाºयावर जबाबदारी असेल. मुद्रांक शुल्क बुडाल्यास त्याची जबाबदारी ग्रामसेवकावर आणि शहर हद्दीत आयुक्तांनी निश्चित केलेल्या अधिकाºयावर कारवाई होईल, असे मुद्रांक जिल्हाधिकारी दुतोेंडे यांनी सांगितले.
--------------
ग्रामपंचायतीच्या हद्दीतील रस्त्यालगतच्या जमिनींचे व्यवहार नोटरीच्या माध्यमातून झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. या सर्व प्रकरणांची चौकशी होईल; मात्र आता पूर्ण जिल्ह्यातील अभिलेखे फेरफार नोंदीची तपासणी आम्ही करणार आहोत. दंड वसुली करुन व्यवहार नियमित करण्यात येतील. बड्या व्यवहारात मोठी कारवाईही होईल. या वर्षात २५५ कोटींचे महसूल वसुलीचे उद्दिष्ट होते. फेब्रुवारीपर्यंत २१५ कोटींचा महसूल मिळाला आहे. मार्चअखेर ११० टक्के महसूल मिळेल. ग्रामपंचायतीच्या अभिलेखांची झाडाझडती झाल्यानंतर महसुलात आणखी प्रचंड वाढ होईल.
- एस.एन. दुतोंडे,
मुद्रांक जिल्हाधिकारी