पालखी मार्गामुळे आता उंचावणार भागवत धर्माचीही पताका- पंतप्रधान नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2021 06:58 AM2021-11-09T06:58:33+5:302021-11-09T06:58:51+5:30
पंढरपूर येथे केंद्राच्या १३ महामार्ग प्रकल्पाच्या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण मोदी यांच्या हस्ते आभासी प्रणालीद्वारे झाले.
पंढरपूर : श्री संत ज्ञानेश्वर व श्री संत तुकाराम पालखी मार्ग भागवत धर्माची पताका उंच करणारा असून विठ्ठलाच्या वारकऱ्यांना नमन करतो, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. पंढरपूर येथे केंद्राच्या १३ महामार्ग प्रकल्पाच्या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण मोदी यांच्या हस्ते आभासी प्रणालीद्वारे झाले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेही आभासी प्रणालीद्वारे उपस्थित होते.
व्यासपीठावर रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, राज्यमंत्री व्ही. के. सिंह, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, अन्य मान्यवर उपस्थित होते. मोदी म्हणाले, वारीमध्ये जातपात नसते. वारकऱ्यांची जात, धर्म एकच आहे. विठ्ठल हे एकच लक्ष्य असते. मी सबका साथ सबका विकास म्हणतो, त्याच्यामागे हीच भावना असते. द्वारकानगरी श्रीकृष्णाची आहे. विठ्ठल हा कृष्णाचा अवतार असल्याने माझे पहिले नाते द्वारकेशी व दुसरे काशीशी आहे. पंढरपूर ‘दक्षिण काशी’ असल्यामुळे माझे पंढरपूरशी विशेष नाते आहे, असे मोदी म्हणाले.
पंतप्रधानांनी मागितले तीन आशीर्वाद
पालखी मार्गावरील पायी रस्त्याच्या बाजूला सावली देणारे वृक्ष लावावेत, पालखी मार्गावर ठिकठिकाणी शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय केली जावी, भविष्यात पंढरपूरला भारतातील स्वच्छ तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जावे, असे तीन आशीर्वाद आपण मागत असल्याचे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.