या कारणामुळे सोलापुरात वाढला उष्माघाताचा धोका !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 01:13 PM2019-03-29T13:13:02+5:302019-03-29T13:15:33+5:30
महेश कुलकर्णी सोलापूर : नेहमी एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वाढणारे तापमान यावर्षी मार्च महिन्यात वाढले आहे. मोठ्या प्रमाणात उष्णता ...
महेश कुलकर्णी
सोलापूर : नेहमी एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वाढणारे तापमान यावर्षी मार्च महिन्यात वाढले आहे. मोठ्या प्रमाणात उष्णता वाढल्यामुळे त्रस्त झालेल्या सोलापूरकरांनी उन्हाळ्यात शरीराची काळजी न घेतल्यास उष्माघाताचा धोका संभवू शकतो. सोलापुरातील वेदर ड्राय असतो. अशा परिस्थितीत रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी जीवनशैलीत काही बदल करण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला आहे.
होळी पार पडली की, उन्हाळा सुरू झाला असे मानले जाते. होळीमध्ये थंडी जळून जाते. मग उरते ती केवळ उष्णता. ही उष्णता शरीरात आणि बाहेरही वाढते. म्हणून शरीराची काळजी दोन्ही बाजूंनी घ्यावी लागते. सोलापुरात दरवर्षी कडक आणि चटके देणारा उन्हाळा असतो. हा उकाडा माणसाला उष्माघातापर्यंत नेतो. म्हणूनच उन्हाळ्यात खूप काळजी घ्यावी लागते. ही काळजी कशी घ्यावी याचे मार्गदर्शन सर्वांना माहीत असले पाहिजे. कारण नेहमीच्या जीवनशैलीतच बदल करावा लागतो.
उन्हात फिरण्याचे टाळणे आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण कायम राहील, यासाठी प्रयत्न करणे, हाच उन्हाळ्यात आरोग्य सांभाळण्याचा सर्वात चांगला उपाय आहे. मात्र उन्हातून फिरण्याची वेळ आल्यास डोळे, डोके व शरीर यांना संरक्षण देणे गरजेचे आहे; तसेच उन्हातून फिरून आल्यानंतर थंड पेय लगेच पिण्याचे टाळावे. उन्हाळा जाणवू लागला आहे. दुपारी अंगाची काहिली होत आहे. काहीवेळा ग्लानी आल्यासारखे वाटते. डोळ्यात काही वेळा लाली येऊन ते चुरचुरल्यासारखे वाटतात. त्यामुळे प्रत्येकानेच स्वत:हून काळजी घेणे आवश्यक असल्याचे डॉ. मनोज जैन यांनी सांगितले.
मुतखडा आणि मूळव्याधीचा धोका अधिक - मनोज जैन
उन्हाळ्यात डीहायड्रेशनचे प्रमाण जास्त असते. शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे गरम हवामानात किडनी स्टोन आणि मूळव्याधीचे रुग्ण वाढतात. उघड्यावरील पदार्थ, रंगीबेरंगी सरबते, उघड्यावर कापून ठेवलेली फळे सेवन केल्यामुळे विषबाधा होण्याचा धोका असतो. मांसाहार टाळून अधिक पाणी आणि सॅलेडचा रोजच्या जेवणात समावेश करावा, असे सर्जन डॉ. मनोज जैन यांनी सांगितले.
त्वचेचा बचाव करण्यासाठी करा हे उपाय - नितीन ढेपे
उन्हामुळे त्वचेवर घामोळ्या, फोड आणि जंतुसंसर्ग होतो. अनेक वेळा काळजी न घेतल्यामुळे त्वचा काळवंडते. यासाठी भरपूर पाणी पिणे, दिवसातून दोन वेळा थंड किंवा कोमट पाण्याने आंघोळ करावी. या पाण्यात दोन थेंब जंतुनाश द्रव्य मिसळावे. बाहेर फिरताना घट्ट वीण असलेले अंगभर सुती कपडे आणि चेहरा पूर्ण झाकल्यास उन्हापासून बचाव करता येतो, असे त्वचारोगतज्ज्ञ डॉ. नितीन ढेपे यांनी सांगितले.
दिवसातून तीन वेळा डोळे धुवा - नवनीत तोष्णीवाल
उन्हाळ्यात डोळ्यांची विशेष काळजी घ्यावी. कडक उन्हामुळे डोळ्यांची आग होऊ शकते. उन्हाळ्यात घेण्यात येणारा गॉगल हा त्याच्या काचा शास्त्रशुद्ध आहेत हे तपासून घ्यावे. दिवसातून दोन-तीन वेळा डोळे स्वच्छ पाण्याने धुवावेत. पाण्याच्या लेअरमुळे डोळे सुरक्षित राहतात. उन्हात फिरल्यामुळे डोळ्यातील पाणी ड्राय होते, हे टाळण्यासाठी गॉगल आणि टोपी वापरावी, असा सल्ला नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. नवनीत तोष्णीवाल यांनी दिला.