या कारणामुळे झाले सोलापूर जिल्ह्यातील आयुष्यमान योजनेचे काम कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2020 10:27 AM2020-03-04T10:27:10+5:302020-03-04T10:30:58+5:30
नोडल अधिकारी नियुक्ती करण्यात झाली चूक: जिल्हाधिकार्यांनी लक्ष घातल्यावर दिले तालुका अधिकाऱ्यांना अधिकार
सोलापूर : नोडल अधिकारी नियुक्त करण्यात गफलत झाल्याने सोलापूर जिल्ह्याच्या आरोग्य विभागाच्या आयुष्यमान योजनेचे काम कमी झाले आहे. त्यामुळे आता प्रत्येक तालुक्याच्या वैद्यकीय अधिकाºयांना अधिकार देण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
गरीब कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यासाठी पाच लाखांच्या विम्याचे कवच देण्यासाठी केंद्र शासनाने आयुष्यमान योजना सुरू केली आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी जिल्ह्यात सन २०१७-१८ मध्ये सर्वेक्षण करून आरोग्य विभागाला अहवाल सादर करण्यात आला. राज्यात सोलापूर जिल्ह्याने सर्वेक्षणाचे काम वेगाने केल्याने सर्वेक्षणात आलेल्या कुटुंबांना आयुष्यमान योजनेचे कार्ड वितरित करण्याची जिल्हा आरोग्य विभागावर जबाबदारी देण्यात आली. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या अधिपत्याखाली झालेल्या बैठकीत या योजनेचे नोडल अधिकारी म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर वेळोवेळी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत आयुष्यमान योजनेचे कार्ड वितरण करण्यात दिरंगाई होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे या योजनेत राज्यात अव्वल असलेल्या सोलापूरचे नाव खाली आले. ही बाब निदर्शनाला आल्यावर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आरोग्य विभागाच्या दोन वेळा बैठका घेतला.
जिल्ह्यात आरोग्य विभागाचे काम दोन विभागात चालते. ग्रामीण रुग्णालयाची जबाबदारी जिल्हा शल्यचिकित्सकांवर आहे तर प्राथमिक आरोग्य केंद्र जिल्हा आरोग्य अधिकाºयांच्या अधिपत्याखाली येतात. यांचे कार्यक्षेत्र मोठे आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी जमादार यांच्या नियंत्रणाखालील तालुका आरोग्य अधिकाºयांनी आयुष्यमानचे नोडल अधिकारी डॉ. प्रदीप ढेले यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केले. यामुळे आयुष्यमान योजनेची अंमलबजावणी म्हणावी तशी झाली नाही. आशा वर्कर, अंगणवाडी सेविकांमार्फत हे काम वेगाने उरकणे अपेक्षित होते. पण यात गडबड होत असल्याचे लक्षात आल्यावर जिल्हाधिकारी शंभरकर यांनी मुख्य कार्यकारी प्रकाश वायचळ व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार यांना योजनेच्या अंमलबजावणीत लक्ष घालण्याच्या सूचना दिल्या. आतापर्यंत दोन लाख कार्डांचे वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक प्रदीप ढेले यांनी दिली. महापालिकेच्या क्षेत्रातही हे काम मागे पडल्याचे दिसून आले आहे. याबाबत महापालिका आयुक्त दीपक तावरे व आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांना सूचना करण्यात आली आहे.
आयुष्यमान योजना राबविण्यात त्रुटी असल्याचे दिसून आल्यावर आरोग्य विभागाच्या बैठका घेऊन अंमलबजावणीस गती दिली आहे. हे काम जलदगतीने उरकण्यासाठी आता तालुका वैद्यकीय अधिकाºयांनाच अधिकार दिले असून, त्यांना कामाचे उद्दिष्ट दिले आहे. त्यामुळे आता हे काम वेगाने होईल, अशी अपेक्षा आहे. -मिलिंद शंभरकर, जिल्हाधिकारी