सर्व्हर डाऊनमुळे सेतूमध्ये रात्री उशिरापर्यंत दाखले देण्याचे काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 02:32 PM2019-06-27T14:32:23+5:302019-06-27T14:35:54+5:30
सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची गर्दी; प्रशासनाकडून गतीमान कारभारर्
सोलापूर : जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू कार्यालयातील सर्व्हर डाऊन होत असल्यामुळे रात्री उशिरापर्यंत कर्मचारी थांबून विद्यार्थ्यांसाठी विविध दाखले देण्याचे काम सुरू आहे.
दहावी व बारावी परीक्षेचा निकाल लागल्यानंतर राज्यभर आॅनलाईन प्रवेश देण्याचे कामकाज सुरू झाले आहे. त्यामुळे सर्व्हर डाऊन होत असल्याने सेतू कार्यालयात दाखले वितरित करण्यास अडचण येत आहे. श्रीनिवास पाटील व शुभम वल्लभदेशी यांनी नॉनक्रिमीलेअर दाखला मिळण्यास विलंब होत असल्याची बुधवारी तक्रार केली. यावर सेतू तहसीलदार जयंत पाटील यांना विचारले असता, सर्व्हर डाऊनमुळे अडचणी येत आहेत, पण कोणत्याही विद्यार्थ्याची गैरसोय होऊ देत नसल्याची माहिती दिली. मंगळवारपर्यंत २५३० अर्ज आले होते, त्यातील जवळपास २३९० अर्ज निकाली काढण्यात आले आहेत.
शनिवारी सर्व्हर पूर्णत: बंद पडले होते. गेल्या दोन दिवसात सर्व्हरची गती मंद आहे. सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत सर्व्हरची गती अत्यंत कमी होते. त्यामुळे दाखल्यासाठी आलेल्या अर्जांची माहिती व कागदपत्रे अपलोड करण्यात अडचण येत आहे. दाखल्यांसाठी आलेल्यांना टोकण देऊन सर्व्हर सुरू झाल्यावर दाखले वितरित करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे रात्री अकरा ते बारापर्यंत सेतू कार्यालयाचे काम सुरू आहे. दिवसभरातील अर्जांची पूर्तता करून रात्री दाखले वितरित करण्याचे काम सुरू होते.
असे चालते काम
च्नॉनक्रिमीलेअर, उत्पन्न, जातीच्या दाखल्यांसाठी आॅनलाईन अर्ज स्वीकारला जातो. अर्जासोबत जोडलेली कागदपत्रे दाखल करून घेण्यासाठी एका लिपिकाची नियुक्ती केली आहे. अव्वल कारकून ही कागदपत्रे तपासून तातडीने तहसीलदारांकडे पाठवितात. तहसीलदारांकडून सहीनंतर ही फाईल पुन्हा सेतूमध्ये आल्यावर दाखले वितरणाचे काम होते. सेतू, प्रांत आणि तहसील कार्यालयात सध्या दाखले वितरणासाठी खास कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. नागरिकांनी अर्ज करताना कागदपत्रांची योग्य जुळणी करणे आवश्यक आहे. त्रुटी निघालेल्या अर्जांना विलंब होतो.