पंढरपूर शहरात जोरदार पाऊस; विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात ठिकठिकाणी गळती
By Appasaheb.patil | Published: June 10, 2024 04:30 PM2024-06-10T16:30:31+5:302024-06-10T16:31:08+5:30
मागील दोन दिवसांपासून पंढरपूर शहरात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.
आप्पासाहेब पाटील, सोलापूर : मागील दोन दिवसांपासून पंढरपूर शहरात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. सलग पडत असलेल्या पावसामुळे विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात ठिकठिकाणी गळती लागली आहे. दरम्यान, गळती संदर्भात मंदिर प्रशासन सतर्क झाले असून तातडीच्या उपाययोजना करण्यासंदर्भात चर्चा, विचारविनियम करण्यात येत आहे. मागील २४ तासात सोलापूर जिल्ह्यात साडेतीन इंचापेक्षा अधिक पाऊस पडल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.
सध्या विठ्ठल मंदिरात सर्व दुरुस्तीची कामे करणे सुरु झाले आहे. आता पुढील ५०० वर्षे विठ्ठल मंदिराचे आयुष्य वाढेल यापद्धतीने कामे हाती घेतली आहेत. दुरूस्तीच्या काळात अनेक घटना समोर आल्या. कामावेळी मंदिरात तळघर आढळून आले, शिवाय पुरातन काळातील मुर्तीही सापडली. सध्या मंदिरात अनेक दुरूस्तीची कामे वेगाने सुरू आहेत. याचकाळात पंढरपूर शहरात पडलेल्या जोरदार पावसामुळं मंदिरात ठिकठिकाणी गळती सुरू झाली आहे. गळतीची पाहणी मंदिर समितीच्या अधिकाऱ्यांनी सकाळी केली. त्यानंतर तातडीच्या उपाययोजना करण्यासंदर्भात वेगाने पाऊले उचलण्यात येत आहेत. लवकरच मंदिराच्या वरच्या भागात वॉटर प्रफ्रुनिंग करण्यात येणार असल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.