वाढत्या उन्हामुळे सोलापुरातील रमजान ईदची नमाज नऊ ऐवजी साडेआठ वाजता होणार
By Appasaheb.patil | Published: April 20, 2023 07:37 PM2023-04-20T19:37:46+5:302023-04-20T19:37:53+5:30
सकाळी ९ ऐवजी ८.३० वाजता रमजान ईदची नमाज होणार असल्याची माहिती शहर काझी मुफ्ती काझी सय्यद अहजदअली यांनी कळविले आहे.
सोलापूर : वाढत्या उन्हामुळे मुस्लिम बांधवांना त्रास होऊ नये यासाठी शहरातील शाही आलमगीर ईदगाह पानगल स्कुल, सोलापूर व आलमगीर ईदगाह होटगी रोड, सोलापूर या दोन ईदगाह मैदानावरील नमाजाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. या मैदानावर सकाळी ९ ऐवजी ८.३० वाजता रमजान ईदची नमाज होणार असल्याची माहिती शहर काझी मुफ्ती काझी सय्यद अहजदअली यांनी कळविले आहे.
सध्या साेलापूर शहरातील तापमानात वाढ झाली आहे. तापमानाचा पारा ४२ अंशाच्या पुढे गेला आहे. मार्च महिन्यात ३७ अंशावर असलेले तापमान एप्रिलच्या पहिल्या आठवड्यानंतर ४० अंशाच्या पुढे गेले होते. त्यानंतर हळूहळू तापमानात वाढ होतच आहे. एप्रिल १५ नंतर उन्हाळा मोठया प्रमाणात वाढला. उकाड्यानं सोलापूरकर हैराण अन् घामेघूम होत आहे. सोलापुरात सकाळी ७ वाजल्यापासूनच उन्हाचे चटके बसायला सुरूवात होत आहे. अशातच मुस्लिम बांधवांच्या आरोग्याच्या दृष्टीने शहर काझी यांनी शहरातील दोन मैदानावरील रमजान ईदच्या नमाज च्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. नऊ वाजता होणारी नमाज आता साडेआठ वाजता होणार असल्याचे कळविले आहे.
ईद चा चाँद पाहण्याचा प्रयत्न करा
शुक्रवारी चंद्रदर्शन झाल्यास शनिवारी रमजान ईद साजरा करण्यात येणार आहे. तरी मुस्लिम बांधवांनी आज शुक्रवार २१ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळच्या सुमारास आकाशात चंद्र पाहावे असेही आवाहन शहर काझी यांनी केले आहे. सध्या सोलापुरात रमजान ईदची तयारी मोठया प्रमाणात सुरू आहे. खरेदीसाठी बाजारपेठेतही गर्दी हाेत आहे.