उन्हाच्या चटक्यानं लिंबू पेट्रोलपेक्षा अधिक खातोय 'भाव', पालेभाज्या ५ ते १० रुपये
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2023 05:42 PM2023-04-02T17:42:31+5:302023-04-02T17:42:49+5:30
बाजारात पालेभाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने गवार, भेंडी वगळता जवळपास सर्व भाजीपाल्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे.
दीपक दुपारगुडे
सोलापूर : बाजारात पालेभाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने गवार, भेंडी वगळता जवळपास सर्व भाजीपाल्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यात मेथीसह पालक, कोथिंबिरीचे भाव प्रचंड प्रमाणात घसरले. पाच ते दहा रुपयांच्या दरात त्याची विक्री सुरू आहे. तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वी दहा रुपयांत दहा ते पंधरा नग मिळणाऱ्या लिंबांना आता मोठी मागणी आहे. उन्हाळ्याची चाहूल लागताच त्यांचे दरही गगनाला भिडले आहेत. शहरातील बाजारपेठेत वीस रुपयांना तीन याप्रमाणे विक्री केली जात आहे. किरकोळ बाजारात दहा रुपयाला दोन लिंबू मिळत आहेत. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यानंतर लिंबाचे भाव वाढण्याची शक्यता आहे.
अतिवृष्टीचा फटका खरीप पिकांसह भाजीपाल्यावर झाल्यानंतर गेले कही दिवस दर्जेदार भाजीपाल्याची आवक मंदावली होती. परिणामी दरात मोठी वाढ झाली होती, परंतु गेल्या आठ दिवसांपासून टप्प्याटप्प्याने सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात भाजीपाल्याची आवक वाढल्याने भाजीपाल्याच्या दरातही मोठी घसरण पाहण्यास मिळत आहेत.
लिंबांच्या मागणीत वाढ
शहर व परिसरात उन्हाचा चटका वाढल्याने रसवंती, लिंबू सरबत, लिंबू शिखंजी, सोडा यासह विविध दुकाने थाटण्यात आली आहेत. परिणामी लिंबाची मागणी वाढल्याने पंधरा दिवसांपासून भाव तेजीत आले आहेत. सध्या लिंबाचे दर १२० ते १५० आहेत. मे महिन्यात लिंबाचे दर दोनशे रुपये किलोपर्यंत जाण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तविली आहे.
भाजीपाल्याचे दर
- लिंबू १२० ते १५०रूपये
- भेंडी : ६० रूपये
- गवार १०० रूपये
- वांगे : ३० रूपये
- मेथी: ५ ते १० रुपये
- पालक : ५ ते १० रुपये
- कोथिंबीर : ५ ते १० रुपये
- शेपू :५ ते १० रुपये