मुसळधार पावसामुळे पिकांसह सखल भागात पाणीच पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:20 AM2021-07-25T04:20:20+5:302021-07-25T04:20:20+5:30
मुसळधार पावसाने सुस्ते परिसरातील शेतातील ऊसाचे पीक भुईसपाट झाले असून इतर पिकांचेही नुकसान झाले आहे. जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न गंभीर ...
मुसळधार पावसाने सुस्ते परिसरातील शेतातील ऊसाचे पीक भुईसपाट झाले असून इतर पिकांचेही नुकसान झाले आहे. जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. शेतकऱ्यांचा शेतातील कामाचा खोळंबा झाला आहे. या भागात मोठ्या प्रमाणात भुईमुगाची लागवड केली जाते. सध्याला भुईमुगाच्या शेंगा काढण्याचे दिवस आहेत. मात्र, पावसाने धुमाकूळ घातल्याने भुईमुगाच्या शेंगा काढण्याचे काम खोळंबले आहे. कडवळ व मका या चाऱ्याच्या पिकाचेही नुकसान झाले आहे.
सुस्ते येथील भारत आप्पा चव्हाण यांनी शेतात गेल्यावर्षी एकरी ११० टनाचा ऊसाचा उतार काढला होता. यावर्षीही त्याच पद्धतीने खर्च करून ऊस पीक सांभाळले. मात्र, मुसळधार पावसामुळे संपूर्ण ऊसाचे पीक भुईसपाट झाले आहे.
कोट :::::::::::::::::::::
७० ते ८० हजार रूपये खर्च करून कलिंगडाचे पीक घेतले होते. मात्र, लाॅकडाऊनमुळे बाजारपेठा बंद असल्याने कलिंगड शेतात जाग्यावर सडून गेली. लाखो रुपये नुकसान होऊन एक महिना झाला नाही, तोच ऊसाचे उभे पीक मुसळधार पावसामुळे भुईसपाट झाले आहे. तरी शासनाने पिकाची पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करून नुकसानभरपाई मिळवून द्यावी.
- भारत चव्हाण
शेतकरी, सुस्ते