आषाढी यात्रा कालावधीत ६४४ जणांना विठ्ठलाचे मुखदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:16 AM2021-07-20T04:16:55+5:302021-07-20T04:16:55+5:30
आषाढी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी पालकमंत्री, मंदिर समितीचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, ...
आषाढी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी पालकमंत्री, मंदिर समितीचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर, सुरक्षा कर्मचारी असे एकूण ५० जण विठ्ठल मंदिरात असणार आहेत. पंढरपूर शहरातील १९४ फडकऱ्यांना आषाढी एकादशी दिवशी दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत विठ्ठल-रुक्मिणीचे मुखदर्शन प्राप्त करून दिले जाणार आहे.
त्याचबरोबर रुक्मिणी माता (कौंडण्यपूर, अमरावती), संत एकनाथ महाराज (पैठण, औरंगाबाद), संत निवृत्ती महाराज (त्र्यंबकेश्वर, नाशिक), संत सोपानदेव महाराज (सासवड, पुणे), संत चांगाटेश्वर महाराज (सासवड, पुणे), संत मुक्ताबाई (मुक्ताईनगर, जळगाव), संत तुकाराम महाराज (देहू, पुणे), संत ज्ञानेश्वर महाराज (आळंदी, पुणे), संत निळोबाराय महाराज (पिंपळनेर, अहमदनगर), संत नामदेव महाराज (पंढरपूर, सोलापूर) या मानाच्या १० पालख्यांतील प्रत्येकी ४० भाविकांना मंदिरात जाण्यासाठी प्रवेश पास देण्यात आले आहेत. असे मानाच्या संतांच्या पालख्यातील एकूण ४०० वारकरी टप्प्याटप्प्याने संतांच्या पादुका भेटीसाठी पौर्णिमेदिवशी विठ्ठल मंदिरात येणार आहेत. असे एकूण ६४४ जणांना विठ्ठल-रुक्मिणी मातेचे मुखदर्शन देण्यात येणार असल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी सांगितले.