कोरोना काळामध्ये गुन्हेगारी क्षेत्रात सोलापूर जिल्ह्यात दिसून आले नवीन चेहरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 12:59 PM2021-06-21T12:59:42+5:302021-06-21T12:59:48+5:30
पोलिसांसमोर तपासाचे आव्हान : संसर्ग कमी झाला अन् गुन्हेही वाढले
सोलापूर : कोरोनाकाळात झालेल्या गुन्ह्यांमध्ये नवीन चेहरे पुढे आले आहेत. त्यामुळे तपास कामात पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. कोरोनाच्या बंदोबस्तापासून आता कुठे थोडाफार आराम पोलिसांना मिळाला असला तरी झालेल्या गुन्ह्यांचा तपास हे एक आव्हान पोलिसांसमोर आहे. मार्च २०२० मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने संचारबंदी जाहीर केली होती.
सलग तीन ते चार महिने संचारबंदी लागू करण्यात आली होती. जून २०२० मध्ये हळूहळू संचारबंदी शिथिल करण्यात येऊ लागली होती. मात्र, नियमाचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी पोलिसांकडून घेतली जात होती. कोरोनाची संख्या कमी होऊ लागल्याने व्यवहार सुरळीत होऊ लागले होते. दरम्यान, पुन्हा फेब्रुवारी २०२१ मध्ये अचानक त्याचा प्रादुर्भाव वाढला आणि पुन्हा शहरासह जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर पुन्हा चोऱ्यामाऱ्या, खून, खुनाचे प्रयत्न हाणामारीसारख्या घटना वाढल्या होत्या. जिल्ह्यातील ११ तालुक्यांमध्ये असलेल्या २५ पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढले होते. दाखल गुन्ह्यांमध्ये नेहमीपेक्षा नवीन गुन्हेगार पुढे येत होते. या प्रकारामुळे पोलिसांना तपास करणे आव्हान ठरत होते.
कोरोनाकाळामध्ये संचारबंदीमुळे एवढे गुन्हे दाखल झाले नव्हते. मात्र, नंतरच्या काळात काही प्रमाणात वाढ झाली होती. मात्र, जिल्हा ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने गुन्ह्यांचा तपास लावण्यास सुरुवात करण्यात आली. तडीपार एमपीडीएसारख्या कारवाया करून गुन्हेगारीवर आळा घालण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. काहींवर मोक्कांतर्गत कारवाई झाली आहे. गुन्हेगारांची गय केली जाणार नाही.
-अतुल झेंडे, अपर पोलीस अधीक्षक
कौटुंबिक गरजा पूर्ण करण्यासाठी पैशांची गरज असते. लॉकडाऊनमध्ये व्यवसाय बंद असल्याने अनेकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले. त्यातून मार्ग काढण्यासाठी वेगळ्या मार्गाचा अवलंब करतात. हा मार्ग चुकीचा असल्याचे कळत असले तरी मानसिक ताण व आर्थिक विवंचनेतून ते असे पाऊल उचलतात. यात युवक वर्ग जास्त असतो. तो हुशार असतो. आता अडचणीत असलो तरी भविष्याचा विचार करून चांगल्या मार्गाकडे जाणे गरजेचे आहे. यात त्यांच्या कुटुंबाची महत्त्वाची भूमिका आहे.
- डॉ. कुंदन कांबळे, मानसोपचारतज्ज्ञ, शासकीय रुग्णालय
गुन्हेगारीत नवे चेहरे का आले?
- - कोरोनामुळे अनेकांचा रोजगार गेल्यामुळे तरुणवर्ग गुन्हेगारीकडे वळला आहे. चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.
- - आर्थिक परिस्थिती खालावल्यामुळेही गुन्हेगार वाढल्याचे प्रकार आढळून आले आहेत.
- - शेतजमिनीचा वाद, संपत्तीचा वाद यातूनही अनेक गावांमध्ये हाणामारीसारख्या घटना घडल्या आहेत.