कोरोना काळात झेडपी शाळेनं साकारली सेंद्रिय परसबाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:21 AM2021-03-18T04:21:12+5:302021-03-18T04:21:12+5:30
शाळेमार्फत विद्यार्थ्यांना घरपोच भाजीपाला पोहोच केला जातो. कोरोना काळात या शाळेने विविध उपक्रम राबवीत विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात टिकवून ...
शाळेमार्फत विद्यार्थ्यांना घरपोच भाजीपाला पोहोच केला जातो.
कोरोना काळात या शाळेने विविध उपक्रम राबवीत विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात टिकवून ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. शाळेचे मुख्याध्यापक संजय गोरवे आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक बाळासाहेब बोडखे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारला आहे. स्वतः शिक्षकांनीच साकारलेल्या शाळेतील या सेंद्रिय परसबागेत कुठल्याही रासायनिक खताचा वापर न करता केवळ गोमूत्र आणि शेण यांचा वापर करून सेंद्रिय शेती करण्यावर भर दिला आहे आणि शेतकऱ्यांनाही या अशा सेंद्रिय शेती करण्याबाबत प्रोत्साहन दिले.
मार्चपासून हा भाजीपाला सुरूही झाला; पण दुर्दैवाने कोरोनाने पुन्हा डोके वर काढले. त्यामुळे शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत; पण याही परिस्थितीत शिक्षक बाळासाहेब बोडखे यांनी हा भाजीपाला विद्यार्थ्यांना थेट घरपोच करण्यास सुरुवात केली. मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंग अशा कोरोनाच्या या त्रिसूत्रीचे काटेकोरपणे पालन केले जात आहे.
कोरोना काळातही विद्यार्थी हितासाठी हा उपक्रम राबविण्याल्याबद्दल सभापती गहिनीनाथ ननवरे, उपसभापती दत्तात्रय सरडे, सरपंच भारत कोकरे, गटशिक्षणाधिकारी राजाराम भोंग, शिक्षण विस्तार अधिकारी आजिनाथ देवकाते, केंद्र प्रमुख महावीर गोरे आणि ग्रामस्थांनी शाळेतील शिक्षकांचे विशेष कौतुक केले.-----
विद्यार्थ्यांनी घरीही केली परसबाग
या परसबागेमध्ये वांगी, टोमॅटो, पालक, मिरची, भोपळा, शेवगा यांची लागवड केली आहे. मार्च महिन्यात प्राथमिक शाळा सुरू होतील या अंदाजाने डिसेंबरच्या सुरुवातीलाच हा भाजीपाला लावण्यात आला. पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने तो जोपासण्यातही आला. प्रत्येक विद्यार्थ्यांनीही अशी छोटीसी परसबाग घरच्या घरी तयार करावी याबाबत प्रोत्साहन देण्यात आले. त्याचप्रमाणे सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी पाहिजे त्याला गोमूत्रसुद्धा उपलब्ध करून दिले. शिक्षकांनी स्वतः विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन, कोरोनाबाबत योग्य काळजी घेत विद्यार्थ्यांनी केलेल्या कामाची पाहणी केली. त्यांचे कौतुकही केले.
-----
शाळा बंद असतानाही बागेची जोपासना
एकीकडे कोरोनाने शाळा बंद असताना या शाळेतील शिक्षक मात्र नियमितपणे शाळेत येऊन ही परसबाग जोपासत आहेत. विद्यार्थ्यांना मोफत भाजीपाला थेट घरी नेऊन देत आहेत. या उपक्रमाबद्दल केंद्रप्रमुख महावीर गोरे, ज्ञान फाउंडेशनचे सचिन भांबुरे, विविध सामाजिक संस्था, तसेच परिसरातील इतर शाळांतील शिक्षकांनीही या शाळेला भेट देऊन परसबागेचे कौतुक केले. शाळा बंद असतानाही बागेची जोपासना
----
खातगाव शाळेतील शिक्षकांनी कोरोना काळातही योग्य काळजी घेत परसबागेचा उपक्रम राबविला. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. इतर शाळाही यातून नक्कीच आदर्श घेतील.
-
गहिनीनाथ ननवरे
सभापती, पं. स., करमाळा.
---
फोटो ओळी : खातगाव नं.२ प्राथमिक शाळेच्या आवारात पिकविलेला भाजीपाला.