जेसीबीनं पाडकाम करताना रक्तबंबाळ झाला नाग, फणा काढून दाखवला राग
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 12:05 PM2022-08-10T12:05:07+5:302022-08-10T12:05:07+5:30
आसरा परिसरातील एनजी कॉलनीतील जुन्या घराचे जेसीबीद्वारे पाडकाम सुरू होते
सोलापूर - सोलापुरातील आसरा येथे घराचे जेसीबीद्वारे पाडकाम करताना पाच फुटांहूनही अधिक लांब असलेला नाग जखमी झाला. त्यावेळी, चवथाळलेला नाग फणा काढून फुत्कारू लागला. मात्र, वन्यजीवप्रेमींनी तत्काळ धाव घेतली आणि राहत संस्थेच्या डॉक्टरांनी त्याच्यावर तीन दिवस काचेच्या नळीचा वापर करून उपचार केले. त्यानंतर, वन्यजीव विभागाच्या उपस्थितीत त्याला सुखरूप निसर्गात सोडण्यात आले. नागाला राहत मिळाली अन् माणसांना केलेल्या कामाचं समाधान.
आसरा परिसरातील एनजी कॉलनीतील जुन्या घराचे जेसीबीद्वारे पाडकाम सुरू होते. जेसीबी पुढील बकेटमुळे भिंतीमध्ये लपून बसलेला नाग फण्याला मार लागल्याने जखमी झाला होता. रक्ताने माखलेला असला तरी नाग अर्ध फणा उभा करून फुत्कारू लागला. हा घडला प्रकार पाहून जेसीबीचालकाने काम थांबविले. त्यानंतर, या घटनेची माहिती वन्यजीवप्रेमी निखिल राठोड यास कळविली. त्यांनी घटनास्थळी पोहचून जखमी नागाला बरणीमध्ये सुखरूप पकडले. नागावर पुढील उपचार करण्यासाठी राहत संस्थेकडे आणण्यात आले.
सोलापूर वनपरिक्षेत्र अधिकारी खलाणे यांना या घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर राहतचे डॉ. आकाश जाधव, अनिकेत, वन्यजीव प्रेमी प्रवीण जेऊरे, गणेश तुपदोळे यांनी नागावर उपचार केले. उपचारानंतर या नागाला जंगलात सोडून देण्यात आले.