मुलीच्या पहिल्या मासिक पाळीवेळी जेव्हा बाबांनाच आई बनावं लागलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 11:03 AM2020-01-31T11:03:36+5:302020-01-31T11:15:19+5:30

पुरुषाला आईपण देणारी एकांकिका ‘थँक यू बाबा’ : जिल्ह्यातील विविध शाळेत होताहेत प्रयोग

During the girl's first menstrual period, the father had to become a mother | मुलीच्या पहिल्या मासिक पाळीवेळी जेव्हा बाबांनाच आई बनावं लागलं

मुलीच्या पहिल्या मासिक पाळीवेळी जेव्हा बाबांनाच आई बनावं लागलं

Next
ठळक मुद्दे‘थँक यू बाबा’ या एकांकिकेत मासिक पाळी या नाजूक विषयाला साद घातली मुलीला समजावून सांगणारी आई दाखविण्यापेक्षा वडील दाखविण्यात आले ही एकांकिका जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये दाखविण्यात येत आहे

शीतलकुमार कांबळे

सोलापूर : वडील आणि त्यांची लाडकी मुलगी दोघेच तिच्या एका स्पर्धेसाठी बाहेरगावी जातात. या दरम्यान मुलीला पहिल्यांदा मासिक पाळी येते. पहिल्यांदाच आलेल्या या अनुभवामुळे ती घाबरते. सोबतीला धीर देणारी आई नसते, अशा वेळी तिच्या बाबांना कोणत्या परिस्थितीला सामोरे जावे लागते? याचे भावनिक सादरीकरण ‘थँक यू बाबा’ या एकांकिकेतून करण्यात येत आहे. संकल्प युथ फाउंडेशनकडून जिल्ह्यातील विविध शाळांमधून या एकांकिकेचे सादरीकरण करण्यात येत आहे. 

‘थँक यू बाबा’ या एकांकिकेत मासिक पाळी या नाजूक विषयाला साद घातली आहे. ही साद घालताना मुलीला समजावून सांगणारी आई दाखविण्यापेक्षा वडील दाखविण्यात आले आहे. ही एकांकिका जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये दाखविण्यात येत आहे. मासिक पाळीविषयी गैरसमज दूर होऊन घरातील पुरुषांनादेखील याविषयी माहिती मिळावी, हा या एकांकिकेचा उद्देश आहे. 

एका क्रीडा स्पर्धेसाठी ४२ वयाचे बाबा आणि १२ वर्षांची त्यांची मुलगी दुसºया शहरात जातात. त्याच दरम्यान मुलीला पहिल्यांदा पाळी येते. यामुळे मुलगी घाबरलेली असते. आपली मुलगी अशी का घाबरत आहे हे तिच्या बाबांना लक्षात येत नाही. ते तिच्या जॅकेटकडे पाहतात तेव्हा तिच्या जॅकेटला रक्त लागल्याचे दिसते. काही वेळ बाबांना देखील अशा वेळी काय करावे कळत नाही. मात्र, ही परिस्थितीच त्यांना आई बनवते. बाबा बाहेर जाऊन गरम पाण्याची बॅग, सॅनिटरी नॅपकिन, ज्यूस घेऊन जातात. मासिक पाळी येणे हे नैसर्गिक आहे. घाबरण्याचे कारण नाही, असे म्हणत मुलीला धीर देतात. मुलगी देखील बाबांचे ऐकत त्यांना ‘थँक यू बाबा’ असे म्हणते. 
एकांकिका झाल्यानंतर फक्त महिला, मुली, तरुणीच नाही तर तिथे असलेल्या पुरुषांच्या डोळ्यांच्या कडा ओल्या होतात. मासिक पाळी नेमकी काय असते, त्यावेळी महिलांना कोणता त्रास होतो, याविषयी फारशी माहिती नसणाºया पुरुषांना ही एकांकिका एक चांगला धडा देते. यामुळे एकांकिका पाहणारी मंडळी बोलती होतात. 

ही एकांकिका मुलीसोबत बाबा आणि भावानेही पाहावी.. 
- थँक यू बाबा’ एकांकिका ही आई, मुलीसोबत बाबा आणि भावानेही पाहावी. घरामध्ये या विषयावर चर्चा व्हावी, जुन्या चालीरीती मोडाव्यात, गैरसमज दूर व्हावा, यासाठी याची निर्मिती केल्याचे संकल्प फाउंडेशनचे किरण लोंढे यांनी सांगितले. एकांकिकेचे लेखन पूजा काटकर हिने केले आहे. शहाजी भोसले, मनस्वी वाघमारे, सागर देवकुळे तसेच पूजा काटकर यांनी अभिनय केला आहे. संगीत सूरज भोसले, प्रकाशयोजना ओंकार साठे यांची आहे. 

‘थँक यू बाबा’ एकांकिकेत मी बाबाची भूमिका केली आहे. आपल्या गोंधळलेल्या मुलीला धीर देणारा एक बाबा आईची भूमिका बजावतो. खरे तर प्रसारमाध्यमातून आलेल्या माहितीच्या आधारे मासिक पाळी आल्यानंतर कोणती काळजी घ्यावी, याची बाबाला कल्पना असते. तरी आपल्या मुलीला कसे सांगावे हा देखील प्रश्न समोर असतो. यातून सावरत तो आपल्या मुलीला आधार देतो. 
- शहाजी भोसले, अभिनेता 

Web Title: During the girl's first menstrual period, the father had to become a mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.