भजन सुरू असताना मित्राच्या अंगावर टाळ भिरकावून केले जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 02:52 PM2019-11-20T14:52:19+5:302019-11-20T14:54:07+5:30
माढा तालुक्यातील अकुलगावातील घटना: मित्रांनी चेष्टा केल्याचे कारण
सोलापूर : हनुमान मंदिरात भजन सुरू असताना मित्रांनी चेष्टा केल्याच्या कारणावरून टाळ फेकून मारल्याची घटना माढा तालुक्यातील अकुलगाव येथे सोमवारी रात्री घडली.
याप्रकरणी ज्योतीराम बोबडे (वय ४२, रा. अकुलगाव, ता. माढा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धनंजय क्षीरसागर याच्याविरूद्ध कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकुलगाव येथील मारूती मंदिरात आठवड्यातून भजनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. सोमवार दि. १८ नोव्हेंबर रोजी रात्री साडेदहा वाजता भजन सुरू होते. त्यावेळी आरोपी धनंजय हा भजन पथकात टाळ वाजवित होता. शेजारीच फिर्यादी ज्योतीराम व इतर मित्र बसले होते.
मित्रांमध्ये कानात काहीतरी कुजबुज झाली व ते सर्वजण हसले. ही चेष्ट मस्करी सहन न झाल्याने संतापलेल्या धनंजय यांने हातातील टाळ ज्योतीरामच्या डाव्या हाताच्या कोपºयावर फेकला. टाळ लागल्याने ज्योतीराम जखमी झाला. त्यानंतर धनंजय याने मित्रांना शिवीगाळ केली. याबाबत धनंजय याच्याविरूद्ध कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३२४, ५0४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास पोलीस नाईक घाडगे यांच्याकडे देण्यात आला आहे. बुधवारी घाडगे घटनास्थळाचा पंचनामा करण्यासाठी गेल्यावर मारूती मंदिराच्या कट्ट्यावर फिर्यादी व आरोपी गळ्यात हात घालून बसल्याचे आढळून आले. ग्रामस्थांनी हे दोघे बालपणापासून मित्र असल्याचे सांगितले. चेष्टामस्करीत अशी घटना घडल्याचे लोक सांगत असल्याचे पोलीस नाईक घाडगे यांनी सांगितले.