विणी हंगाम काळातच उजनी धरणात बेसुमार मासेमारी झाली सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 12:21 PM2020-09-29T12:21:43+5:302020-09-29T12:23:30+5:30
मत्स्यबीज घटले; लॉकडाऊननंतर मागणी वाढल्याचा परिणाम
अक्षय आखाडे
जेऊर : महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेल्या उजनी धरणातील माशांना श्रावण आणि गणेशोत्सवानंतर महाराष्ट्रातून मागणी वाढली आहे. काठोकाठ भरलेल्या उजनीतील पाण्यात मच्छीमारांना मासे मिळण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. दरवर्षी उन्हाळ्यात उजनी जलाशयातील माशांना मागणी वाढते; मात्र यंदा लॉकडाऊन असल्याने उजनी जलाशयातील मासेमारी उन्हाळ्यामध्ये बंद होती. त्यानंतर या माशांना महाराष्ट्रातून मागणी आली़ परिणामत: उजनीत बेसुमार मासेमारी सुरु झाली.
मे महिन्याचा शेवटचा आठवडा ते सप्टेंबर दरम्यान माशांचा विणीचा हंगाम असतो. ऐन विणीच्या हंगामात माशांना मागणी वाढली. या काळातच माशांचे बीज पाण्यात मोठ्या प्रमाणावर तयार होते. पण याच कालावधीमध्ये मासेमारी भरपूर झाली़ त्यामुळे पाण्यातील बीज कमी झाल्याने माशांची संख्या घटली आहे. उजनी जलाशयातील माशांचे प्रमाण कमी झाल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे़ सध्याच्या काळात पुणे आणि धरण परिसरातील पावसामुळे उजनी धरणात पुरेसा पाणीसाठा आहे़ या जलाशयातील पाण्याचे प्रदूषण वाढल्याने गेल्या काही वर्षात इथल्या पाण्यात प्रामुख्याने चिलापी हा अत्यंत दूषित पाण्यातला मासा सापडतो़ धरणात सापडणाºया चिलापी या एकमेव माशाचे प्रमाण देखील आता अत्यल्प ठरले आहे़
इंदापूर, भिगवणमध्ये होतो लिलाव
माशांसाठी इंदापूर आणि भिगवण हे दोनच मुख्य बाजारपेठ आहेत. उजनीकाठची ही मुख्य आणि मोठी गावे आहेत. शिवाय इथूनच उजनी जलाशयातील मासे शहरात पाठवले जातात. उजनी धरणाच्या शेजारील गावातील मासेमारी करणारे मच्छीमार इंदापूर आणि भिगवण येथे त्याची लिलाव पद्धतीने विक्री करतात़ येथूनच मासे इतर ठिकाणी वितरित होतात़ भिगवण येथील मासे हे संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत़
उजनी शंभर टक्के भरूनही पाहिजे त्या प्रमाणात मासे सापडत नाहीत़ असे चित्र सगळीकडे दिसते आहे. याचे शास्त्रीय कारण असे सांगता येईल की मे ते आॅगस्ट या चार महिन्यात माशांचा विणीचा हंगाम असतो. या काळात माशाचे बीज पाण्यात मोठ्या प्रमाणावर तयार होते. पण याच कालावधीमध्ये जर मासेमारी भरपूर झाली़ पाण्यात बीज कमी प्रमाणात तयार होऊन त्याचा उत्पादनावर परिणाम होतो.
- विकास काळे, उजनीचे अभ्यासक, केत्तूर
गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा मासे अत्यल्प मिळत आहेत. लॉकडाऊननंतर माशांना मागणी वाढली आहे; मात्र पाण्यात वाढलेले गवत नासल्याने पाणी देखील दूषित झाले आहे. शिवाय मासे देखील मिळत नाहीत़
- दत्तात्रय डिरे, केत्तूर (ता़ करमाळा)