पोखरापूरच्या यात्रेत सापळा रचून घरफोड्यातील सराईतास पकडले; आठ तोळे दागिन्यांसह चार लाखांचा ऐवज जप्त
By काशिनाथ वाघमारे | Published: December 21, 2023 09:27 PM2023-12-21T21:27:37+5:302023-12-21T21:28:22+5:30
सोलापूर जिल्ह्यात मध्यंतरी भरदिवसा घरफोडी होण्याचे प्रमाण वाढले होते. या घरफोडींचा मास्टर माईंड मोहोळ तालुक्यातील पोखरापूर येथील यात्रेमध्ये आल्याची गोपनीय माहिती वैरागच्या डीबी पथकाला मिळाली.
सोलापूर : वैराग पोलिस ठाणे हद्दीत घडलेल्या घरफोड्यांचा तपास लागला आहे. सराईत सिद्धू शामराव काळे याला सापळा रचून पकडण्यास वैराग पोलिसांना यश आले आहे. त्याच्याकडून आठ तोळे सोन्यासह चार लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून त्याने चार गुन्ह्यांची कबुली दिली आहे.
सोलापूर जिल्ह्यात मध्यंतरी भरदिवसा घरफोडी होण्याचे प्रमाण वाढले होते. या घरफोडींचा मास्टर माईंड मोहोळ तालुक्यातील पोखरापूर येथील यात्रेमध्ये आल्याची गोपनीय माहिती वैरागच्या डीबी पथकाला मिळाली.
वैराग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विनय बहिर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचला आणि सराईत गुन्हेगार सिद्धू शामराव काळे (रा. चिंचोली एमआयडीसी, ता. मोहोळ, सध्या रा. शेळगाव (आर), ता.बार्शी) यास ताब्यात घेतले. वैराग पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चारही घरफोड्यांची त्याने कबुली दिली असून त्याने स्वतःहून आठ तोळे सोने पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. मंगळसूत्र, कर्णफुले, मणी, ठुशी, अंगठी यांच्यासह रोख पाच हजार रुपये आदी दागिन्यांचा समावेश आहे, या गुन्ह्यामध्ये वापरलेली एक दुचाकी मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे.
ही कामगिरी पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी जालिंदर नालकुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विनय बहिर, उपनिरीक्षक तानाजी पवार, पोहेकॉ संताजी आलाट, पोना अजय बुरले, पोकॉ पंडित गवळे, पोकॉ आकाश कांबळे,पोकॉ स्वप्निल शेरखाने, पोकॉ गणेश चव्हाण, पोकॉ सुनील मारकड यांच्या पथकाने केली.
जत, मोहोळ, सोलापुरात गुन्हे दाखल
या सराईतावर वैराग पोलिस ठाण्यामध्ये चार गुन्हे, विजापूर नाका पोलिस ठाण्यामध्ये दोन गुन्हे, सोलापूर तालुका पोलिस ठाण्यामध्ये चार गुन्हे, जत पोलिस ठाण्यामध्ये एक गुन्हा, मोहोळ पोलिस ठाण्यामध्ये एक गुन्हा दाखल आहे.