सीटवर धूळ अन् जागोजागी प्लॅस्टिक कचरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:43 AM2020-12-05T04:43:36+5:302020-12-05T04:43:36+5:30
कोरोना महामारीमुळे सध्या स्वच्छतेला प्राधान्य दिले जात असताना सोलापूरच्या प्रवाशांना मुंबईला जाताना अस्वच्छ रेल्वे गाडीतून प्रवास करावा लागत आहे. ...
कोरोना महामारीमुळे सध्या स्वच्छतेला प्राधान्य दिले जात असताना सोलापूरच्या प्रवाशांना मुंबईला जाताना अस्वच्छ रेल्वे गाडीतून प्रवास करावा लागत आहे. मंगळवारी रात्री निघालेल्या सोलापूर-मुंबई सिद्धेश्वर एक्स्प्रेस गाडीमधील एस-३ बोगीत अस्वच्छता आढळून आली. याबाबत रेल्वे प्रवाशांनी स्टेशनवरील अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी स्वत:चे सीट स्वत: स्वच्छ करून बसा अन् प्रवास करा, असे सांगितले. त्यानंतर संतप्त प्रवाशांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करून अस्वच्छतेबाबत सांगितले. या तक्रारीची दखल घेत कुर्डूवाडी रेल्वे स्टेशनवर चार सफाई कर्मचारी दाखल झाले आणि दोन मिनिटांतच कपडा झटकत तात्पुरत्या स्वरूपात स्वच्छता केली. त्यानंतर प्रवाशांनी यावर समाधान न झाल्याने पुन्हा तक्रार करण्यात आली. प्रवाशांची ही तक्रार तिकीट तपासणी अधिकाऱ्यांनी आरपीएफ पोलिसांना सांगितली. त्यानंतर दौंड येथे स्टेशनवर रात्री १.३० वाजता पुन्हा रेल्वे सफाई कर्मचारी आले अन् रिकाम्या सीटवर कपडा व सॅनिटायझर मारून स्वच्छ केले.
----------
अस्वच्छतेबाबची लेखी तक्रार
सोलापूरहून निघणारी सिद्धेश्वर एक्स्प्रेस सातत्याने अस्वच्छ असते. सीटवर नेहमीच कचरा व धूळ साचलेली असते. त्यामुळे प्रवाशांना प्रवास करताना त्रास होतो. याबाबत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे, अशी तक्रार लेखी स्वरूपात एस-३ बोगीमधील सर्व प्रवाशांनी तिकीट तपासणी अधिकारी व आरपीएफ जवानांना दिली.