दुकानात धूळ साचली, नागरिकांची डोकी फुटली तरी सोलापूर महापालिकेला जाग येईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 01:27 PM2021-01-20T13:27:12+5:302021-01-20T13:27:19+5:30

सोलापूर महापालिका अधिकाऱ्याचा संवेदनाहीन कारभार : दत्त चौकात दोन महिन्यांपूर्वी खोदलेला रस्ता तसाच

The dust settled in the shop, the heads of the citizens were shattered but the Solapur Municipal Corporation did not wake up | दुकानात धूळ साचली, नागरिकांची डोकी फुटली तरी सोलापूर महापालिकेला जाग येईना

दुकानात धूळ साचली, नागरिकांची डोकी फुटली तरी सोलापूर महापालिकेला जाग येईना

googlenewsNext

सोलापूर : दत्त चौकात ‘द फर्स्ट चर्च’च्या बाजूने खोदलेला रस्ता ‘मौत का कुआं’ ठरला आहे. या रस्त्यावर पडून लोकांची डोकी फुटली. दुकानातील लाखो रुपयांच्या साहित्यावर धूळ साचली. छातीत धूळ साचून जीव जायची वेळ आली तरी महापालिकेचे अधिकारी आणि ठेकेदार रस्ता दुरुस्त होईना, अशा तक्रारी येथील दुकानदारांनी मंगळवारी ‘लोकमत’कडे मांडल्या.

लक्ष्मी मंडई ते शिंदे चौकादरम्यान ड्रेनेज लाइन टाकण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी रस्ता खोदण्यात आला. लक्ष्मी मंडई ते शुभराय टॉवर यादरम्यान चेंबरसाठी खोदलेले खड्डे आहे तसेच आहेत. त्यापेक्षा भयानक अवस्था चर्चच्या बाजूने भुईकोट किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर आहे. रस्त्याच्या मधोमध आडवे-तिडवे खोद काम केले आहे. पाइप टाकून झाल्यावर ठेकेदाराने रस्ता सपाट करणे अपेक्षित होते. सध्या या ठिकाणी दगड, मातीचे ढीग आहेत. त्यातून मार्ग काढणारे सोलापूरकर धुळीने माखून जातात. पाय टेकवीत, जीव मुठीत धरून दुचाकी-चारचाकी बाहेर काढतात. महापालिकेचे विविध पक्षांचे नगरसेवक, नेते या भागातच राहतात. या चौकातच या नेत्यांचे भले मोठे बेकायदेशीर डिजिटल होर्डिंग लागलेले असतात; पण या कथित विकासपुरुषांना सोलापुरातील रस्त्यांची दुर्दशा दिसत नाही.

----

चौकात जायचे म्हटलं तरी जिवाला धोका

दत्त चौकात चारही बाजूने खोदकाम केले आहे. चौकात जायचे म्हटले तरी भीती वाटते, असे या भागातील रहिवासी प्रसाद देशमुख म्हणाले. चौकात खोदकाम करताना पाइप फोडण्यात आले आहेत. नळाला पाणी आले की रस्त्यावर चिखल साचतो. दुसऱ्या दिवशी वाळलेल्या चिखलातून धूळ उडते.

----------

धुळीमुळे लोक दुकानात येत नाहीत. मालावर धुळीचा थर साचला आहे. दोन महिन्यांपासून आम्ही रस्ता दुरुस्त करण्याची मागणी महापालिकेकडे केली आहे. आमच्या समोर लोक रस्त्यावर पडतात. रस्त्यावर दगड टाकून जाण्याची पद्धत कधीच पाहिली नव्हती. या दगडावर डोके फुटून एखाद्याचा जीव जायचा म्हणून आम्हीच आमच्या दुकानासमोरचे दगड हटवून घेतले. इतका बेफिकीर कारभार कसा सहन करायचा.

- संदेश कोठारी, दुकानदार.

---

ड्रेनेजसाठी आणलेले पाइप दुकानदासमोरच टाकून गेले. पार्किंगला अडचण होते. लोक रस्त्यावरच वाहने लावून जातात. आमच्या समोरच सोमवारी एक जण पडला. त्याने हात टेकविले म्हणून बरे झाले. डोक्याला लागले असते तर भयंकर काहीतरी घडले असते. आम्ही विकासकामांना सहकार्यच करतो; पण ही कामे आमच्या जिवावर उठली आहेत.

- रियाज मणियार, दुकानदार.

----------------

पडता-पडता वाचलेला तरुण म्हणाला...

सुनील सावळगी हा दुचाकीस्वार तरुण मंगळवारी दुपारी दीड वाजेच्या सुमाराला या रस्त्यावरील मातीच्या ढिगाऱ्यावरून पडता पडता वाचला. येथील दुकानदार त्याच्या मदतीला धावले. सावळगी म्हणाला, सोलापूरचे रस्ते आमच्या जिवावर उठले आहेत. कोणत्या चौकात कधी खोदकाम होणार, रस्ता कधी पूर्ण होणार याची माहिती मिळत नाही. सोलापूरला स्मार्ट करा किंवा याच्यापेक्षा आणखी काहीतरी जास्त करा; पण कामात शिस्त ठेवा. किती दिवस आम्ही सहन करायचे हे तरी सांगा.

 

------------

Web Title: The dust settled in the shop, the heads of the citizens were shattered but the Solapur Municipal Corporation did not wake up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.