पुुलावरून दुथडी पाणी.. जीवघेणा प्रवास; किती दिवस सोसायचा हा वनवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:26 AM2021-09-05T04:26:25+5:302021-09-05T04:26:25+5:30
दोन तालुक्याची वाहतूक ठप्प लोकमत न्यूज नेटवर्क बार्शी : बार्शी तालुक्यातील श्रीपतपिंपरीमार्गे माढा तालुक्यात जाण्यासाठी असलेल्या रस्त्यावरील ...
दोन तालुक्याची वाहतूक ठप्प
लोकमत न्यूज नेटवर्क
बार्शी : बार्शी तालुक्यातील श्रीपतपिंपरीमार्गे माढा तालुक्यात जाण्यासाठी असलेल्या रस्त्यावरील ओढ्यावरील जुन्या पुलाची उंची कमी आहे. या पुलावर संरक्षण लोखंडी गार्ड नसल्याने प्रत्येक पावसाळ्यात पुलावरून पाणी वाहत आहे. गावच्या दळणवळणाबरोबरच माढा तालुक्यात जाणारी वाहतूकही सध्या ठप्प होऊन या पावसाचे पाणी पुलावरून वाहू लागले आहे. हा जीवघेणा प्रवास आणखी किती दिवस करायचा, असा सवाल इथले ग्रामस्थ विचारू लागले आहेत.
हा घोर ओढा बार्शी-कुर्डूवाडी रोडवरून श्रीपतपिंपरी गावाकडे जाणाऱ्या रोडवर असून, माढा तालुक्यातील अनेक गावांना बार्शीची बाजारपेठ जवळ असल्याने माढा तालुक्यातील अनेक गावांची वाहतूक याच मार्गाने होते, तर याच घोर ओढ्यात बार्शी तालुक्यातील कुसळंब, जामगाव आ., बार्शी शहर, कासारवाडी, गोडसेवाडी, अलीपूर, खांडवी, कोरफळे या गावांत असलेल्या ओढे, नाल्यातून वाहणारे पावसाचे पाणी या घोर ओढ्यात वाहून येत असल्याने त्याला नदीचे स्वरूप येऊन थोडा जरी पाऊस पडला तरी पुलावरून पाणी वाहते, त्यामुळे वाहतूक पूर्णत: बंद पडते.
----
आजवर मन्युष्यहानी अन् जनावरेही वाहून गेली
या ओढ्यावरील पूल हा जिल्हा परिषदेच्या अखत्यारित असून, या ओढ्याचे काम दोन वर्षांपूर्वी डागडुजी करताना त्याची उंची वाढविलेली नसल्याने मोठा पाऊस पडताच या ओढ्यावरील वाहतुकीच्या रस्त्यावरून गेल्या १५ दिवसांपासून पाणी वाहते. तो फारच जुना नादुरुस्त अवस्थेत आहे. त्याची उंची कमी असल्याने पुलावरून पाणी वाहताना पाण्याचा अंदाज येत नसल्याने आजपर्यंत मनुष्यहानीबरोबरच जनावरेही वाहून गेली आहेत.
---
निवेदने देऊनही प्रशासन दखल घेईना
या प्रश्नासाठी ग्रामस्थांनी लेखी निवेदने व आंदोलन करूनही प्रशासनाने दखल घेतली नाही. ही समस्या कायमची दूर होण्यासाठी पुलावरून वाहतूक होण्यासाठी घोर ओढ्यावर नवीन पूल मंजूर करावा, अन्यथा पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येऊ देऊ नये, अशी मागणी होत आहे. यासाठी सरपंच रामराजे ताकभाते, माजी सरपंच बाळराजे पाटील, आप्पा ताकभाते व नागरिक या ओढ्यावर येऊन पुढील दिशा ठरविणार आहेत.
---- ०४बार्शी-घोर ओढा
या घोर ओढा पुलाची उंची कमी असल्याने त्यातील पाणी रोडवरून वाहताना, त्यातून नागरिक जीव धोक्यात घालून जात असताना दिसत आहेत.