द्वादशीला दाखवला पांडुरंगाला मानाचा नैवेद्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:15 AM2021-07-22T04:15:17+5:302021-07-22T04:15:17+5:30
बुधवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास रुक्मिणीमाता (कौंडण्यपूर) व श्री संत निळोबाराय (पिंपळनेर) यांच्या पादुका श्री विठ्ठल मंदिरात पालखीच्या विश्वस्त ...
बुधवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास रुक्मिणीमाता (कौंडण्यपूर) व श्री संत निळोबाराय (पिंपळनेर) यांच्या पादुका श्री विठ्ठल मंदिरात पालखीच्या विश्वस्त मानकऱ्यांनी सभामंडपामध्ये आणल्या. येथे मंदिर समितीच्या वतीने पादुकांचे पूजन व पालखीतील वीणेकरी व विश्वस्त मानकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर सभामंडपातच टाळ मृदंगाच्या गजरात भजन, कीर्तन पार पडले. मंदिरात पादुका भेटीसाठी आलेल्या संतांच्या पादुकांना श्री विठ्ठलांचे दर्शन घडवण्यात आले.
यावेळी मंदिर समितीचे सदस्य हभप ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, हभप प्रकाश जवंजाळ महाराज, शकुंतला नडगिरे, भागवतभूषण अतुलशास्त्री भगरे, नगराध्यक्षा साधना भोसले, कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड उपस्थित होते.
सभामंडपात हरिनामाचा गजर
परंपरेप्रमाणे बुधवारी द्वादशीच्या दिवशी श्री संत गजानन महाराज संस्थान, श्री संत मुक्ताई संस्थान, गोमाजी महाराज संस्थान, ज्ञानेश्वर महाराज संस्थान, बेलापूरकर महाराज संस्थान, तुकाराम महाराज संस्थान, सोपानदेव समाधी मंदिर, निवृत्ती महाराज संस्थान, श्रीमंत शितोळे सरकार, देशमुख महाराज दिंडी, आजरेकर महाराज फड, निळोबाराय संस्थान, विठ्ठल- रुक्मिणी संस्थान, कौंडण्यपूर या संस्थांच्या वतीने पांडुरंगाला मानाचा नैवेद्य दाखवला. यानंतर सभामंडपात हरिनामाचा गजर करण्यात आल्याची माहिती कार्यकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.
-----
२१पीपीएन-वारी०१,०२
पांडुरंगाला मानाचा नैवेद्य दाखवून परतताना श्री संत गजानन महाराज पालखीतील प्रमुख. (छाया : सचिन कांबळे)
फोटो : पांडुरंगाच्या भेटीनंतर पश्चिम द्वारातून परतताना संत निळोबारायाची पालखी. (छाया : सचिन कांबळे)