स्मार्ट सिटीतून सोलापूरच्या परिवहनला मिळणार ‘ई-बस’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 03:11 PM2018-06-06T15:11:09+5:302018-06-06T15:11:09+5:30
सोलापूर : शहरातील हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी स्मार्ट सिटी योजनेतून महापालिका परिवहनला ई बस घेण्यासाठी मदत करा अशी सूचना स्मार्ट सिटी योजनेचे मिशन डायरेक्टर कुणाल कुमार यांनी आयुक्तांना केली.
स्मार्र्ट सिटी योजनेत निवड झालेल्या आठ शहरांच्या कार्यकारी अधिकाºयांची पुण्यात सोमवारी आढावा बैठक झाली. या बैठकीला सोलापूर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीचे कार्यकारी अधिकारी तथा आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे उपस्थित होते. मिशन डायरेक्टर कुणाल कुमार यांनी स्मार्ट सिटी योजनेच्या कामांचा आढावा घेतला.
सुरू असलेली कामे व प्रस्तावित कामांची माहिती घेऊन नागरिकांना स्मार्ट सिटी योजनेच्या कामाचा प्रभाव दिसण्यासाठी टेंडर प्रोसेस लवकर करून कामे सुरू करा अशा सूचना त्यांनी दिल्या. स्मार्ट सिटी योजनेतील टेंडर तीन-तीन वेळा काढत बसू नका. स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनी आहे. कंपनीला असलेल्या खास अधिकाराचा वापर करून कामाचे योग्य नियोजन करा. येत्या तीन महिन्यात कोणती कामे करावयाची याची यादी तयार ठेवा. नागरिकांवर प्रभाव पाडतील अशी कामे प्राधान्याने हाती घ्या असे सांगितले.
त्यानंतर महापालिका परिवहन सेवा सक्षम करण्यासाठी स्मार्ट सिटी योजनेतून काय मदत करता येऊ शकते याबाबत आयुक्त डॉ. ढाकणे यांनी मार्गदर्शन मागितले. त्यावर मिशन डायरेक्टर कुमार यांनी स्मार्ट सिटीत पर्यावरणपूरक गोष्टींवर भर देण्यात आला आहे.
हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी ई बससाठी मदत देता येईल. पुणे, अहमदाबाद शहराने या बस घेतल्या आहेत. ई बसमधून मिळणाºया उत्पन्नातून होणारा खर्च जादा असेल तर तो फरक देण्याची तरतूद महापालिकेकडून करता येईल. परिवहन विभाग हा स्वतंत्र आहे. या विभागाने ठराव करून दिला तर या प्रस्तावावर विचार करू.