ई-मेल अन् जी-मेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:22 AM2020-12-06T04:22:45+5:302020-12-06T04:22:45+5:30
आज व्यवसायामध्ये तुम्ही अनेक प्रकारे ई-मेलची मदत घेऊ शकता. महत्त्वाचे संदेश, गोपनीय माहिती, डॉक्युमेंट्स फोटोज्, ऑडिओ, व्हिडिओ आदी बऱ्याच ...
आज व्यवसायामध्ये तुम्ही अनेक प्रकारे ई-मेलची मदत घेऊ शकता. महत्त्वाचे संदेश, गोपनीय माहिती, डॉक्युमेंट्स फोटोज्, ऑडिओ, व्हिडिओ आदी बऱ्याच गोष्टी पाठविण्यासाठी तुम्ही ई-मेलचा अत्यंत प्रभावीपणे वापर करू शकता.
-
नवी पिढी Vs जुनी पिढीमध्ये याबाबत काय अंतर आहे?
आपली नवी पिढी जी मुळातच जन्मली कॉम्प्युटरच्या युगात. त्यांना या सर्व बाबी जरी डाव्या हाताच्या मळासारख्या वाटत असल्या तरी जुन्या पिढीत मात्र याबाबत अजूनही बरेच समज-गैरसमज आहेत. बऱ्याच लोकांना ई-मेल करता येत नाही. ई-मेल आयडी बनवता येत नाही आणि कित्येक जणांना ई-मेल आणि जी-मेल यातील अंतरही कळत नाही; मात्र तुम्हाला आता काळजी करण्याचे काही एक कारण नाही, कारण या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या लेखांतर्गत १०० टक्के मिळतील.
-
तुम्हाला ई-मेल आणि जी-मेल मधील फरक माहीत आहे का?
यासाठी प्रथम आपल्याला ई-मेल म्हणजे काय? आणि जी-मेल म्हणजे काय? हे समजून घेणे गरजेचे आहे. जेव्हा आपल्याला या दोन्ही बाबी स्पष्ट होतील. तेव्हा आपोआपच आपल्याला ई-मेल आणि जी-मेलमधील फरक लक्षात येईल.
-
ई-मेल म्हणजे काय?
ई-मेलचा पूर्ण अर्थ आहे ‘इलेक्ट्रॉनिक मेल’. इंटरनेटच्या माध्यमातून एका माणसाने दुसऱ्या माणसास पाठवलेल्या पत्रास ‘ई-मेल’ असे म्हणतात. जसे पोस्ट ऑफिस आपले लेखी पत्र एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवते, अगदी तसेच ई-मेलद्वारे आपण हे इलेक्ट्रॉनिक पत्र जगाच्या पाठीवर कुठेही पोहोचवू शकतो आणि तेही क्षणार्धात. यासाठी अट मात्र एकच आणि ती म्हणजे, दोन्ही माणसांजवळ ई-मेल असणे गरजेचे आहे.
-
जी-मेल म्हणजे काय?
जी-मेल ही एक ई-मेलचीच सुविधा आहे. जी गुगलने निर्माण केली आहे. ही सुविधा सर्वांसाठी मोफत उपलब्ध आहे म्हणजे ‘एकदम चटकफू’. या सेवेसाठी आपल्याकडे लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर असण्याची मुळीच आवश्यकता नाही. आपल्या जवळील ॲण्ड्रॉईड मोबाईल आणि इंटरनेटचा वापर करूनदेखील आपण या सुविधेचा लाभ घेऊ शकतो.
-
ई-मेलसाठी फक्त जी-मेल हा एकच पर्याय उपलब्ध आहे का?
मुळीच नाही. अनेक ई-मेल सुविधांपैकी जी-मेल ही एक सुविधा आहे. जी-मेलसारखीच हॉटमेल, याहू, रेडिफमेल आदी सुविधादेखील आपण वर दिलेल्या पद्धतीने खाते उघडून वापरू शकता. पण जास्त प्रचलित व सोपी जी-मेल आहे. त्याच बरोबर आपण इंटरनेटवर आपल्या व्यवसायाच्या नावानेदेखील ई-मेल खाते उघडू शकतो.
चला तर मग ज्यांच्याकडे अजूनही कोणताही ई-मेल किंवा जी-मेल नाही, त्यांनी हा लेख वाचून आपले इलेक्ट्रॉनिक मेल खाते उघडावे म्हणजे मी लिहिलेल्या या लेखाचे सार्थक होईल, असे मी समजेन.
- पवनकुमार झंवर