पंढरपूरातील ‘पालवी’त असलेल्या एचआयव्हीबाधित कन्यांचा लवकरच विवाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 11:31 AM2018-12-01T11:31:26+5:302018-12-01T11:35:05+5:30
मूल्यशिक्षण अन् आरोग्य सेवा : आठ वर्षे पूर्ण झालेल्यांचे होणार शुभमंगल
प्रभू पुजारी
पंढरपूर : अनाथ एड्सबाधित मुलं-मुली आणि महिलांना आयुष्य सुखानं अन् आनंदानं जगता यावं, या हेतूने मंगल शहांची मुलगी डिंपल घाडगे यांनी पंढरपूरमध्ये ‘पालवी’ हे पुनर्वसन केंद्र सुरू केले. इथल्या मायेच्या स्पर्शाने अनेक मुलं-मुलींच्या आयुष्याला खºया अर्थाने पालवी फुटली. त्याचे वटवृक्ष होण्यासाठी पालवीत वाढलेल्या या कन्यांचा लवकरच सामुदायिक विवाह करण्याचे नियोजन असल्याचे मंगल शहा यांनी सांगितले.
बालकांचं मूलभूत हक्क एचआयव्हीबाधित बालकांनाही मिळावं, म्हणून पालवी ही संस्था कार्य करीत आहे. प्रभा-हिरा प्रतिष्ठानमार्फत पालवीचं कामकाज चालतं. इथं मुलांना पोषक आहार, शिक्षण व आरोग्य सुविधा दिल्या जातात. शिवाय चांगलं मूल्यशिक्षण देऊन स्वयंपूर्ण बनविलं जातं.
पालवीमध्ये समाजाने नाकारलेल्या मुलांचा सांभाळ केला जातो, त्यांचं पुनर्वसन केलं जातं म्हणून पालवी या मुलांचं हक्काचं आणि प्रेमाचं घर बनलंय़ इथल्या मुलांना केवळ सहानुभूतीची गरज नाही, तर त्यांची क्षमता सिद्ध करण्यासाठी त्यांना संधी हवी आहे. त्यांची लढाई ते लढतच आहेत. त्यांच्यामधील ऊर्जा टिकवण्यासाठी गरज आहे थोडासा आधार आणि प्रोत्साहनाची. या मुलांचं जीवनमान उंचावण्यासाठी अन् त्यांना आनंद देण्यासाठी समाजानंही मदतीचा हात पुढं केला पाहिजे.
या पालवीतील मायेच्या पदराखाली वाढलेल्या काही मुलीचं वय १८ वर्ष पूर्ण झालेलं आहे़ त्यामुळं त्यांचा एकत्रितच सामुदायिक विवाह सोहळा करण्याचं नियोजन आहे़ यापूर्वी दोन मुलींची लग्नं केली आहेत़ माढा आणि नाशिक इथं त्यांनी सुखाचा संसार थाटला आहे़
सध्या पालवीमध्ये ३३ मुलं आणि ५७ मुली आहेत़ या ठिकाणी पहिली ते दहावीपर्यंतचं शिक्षण दिलं जातं़ १० वीच्या दोन बॅच बाहेर पडल्या असून दोन्ही वर्षी १०० टक्के निकाल लागला आहे़ सध्या या संस्थेतील ६ मुली कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेतात़ येथील मुला-मुलींना शिक्षणाबरोबरच शिलाई मशीन, पेपरपासून फुले बनविणे, बाहुली, ग्रेटिंग कार्ड, नारळाच्या केशरापासून वस्तू बनविण्याचं प्रशिक्षण दिलं जातं..या बनविलेल्या वस्तू विविध ठिकाणच्या प्रदर्शनात विक्रीसाठी ठेवल्या जातात़ या सर्व गोष्टी मुलं-मुलीच करतात़ यातून त्यांना व्यवहारज्ञान अवगत व्हावं, हा यामागचा हेतू आहे.
परिपूर्ण शिक्षण
- इथल्या मुला-मुलींना पहाटे योगा, त्यानंतर प्रार्थना, सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, दु़ ४ वाजण्याच्या सुमारास खाऊ त्यानंतर मैदानी खेळ, सायं़ ७़३० वाजता रात्रीचे जेवण, रात्री ९ वाजता जल्लोष कार्यक्रम असतो़ त्यात गाणी, गप्पागोष्टी, नृत्य, लेख वाचन आदी कार्यक्रम घेतले जातात़ एकूण व्यक्तिमत्त्व विकास होण्यासाठी प्रयत्न केला जात असल्याचं मंगल शहा यांनी सांगितलं़ या सर्व मुला-मुलींना मंगल शहा यांच्यासह मुख्याध्यापिका वंदना पाटील, राहुल देठे, रविकिरण गुंड, प्रवीण पठाण, आऱ एस़ देवकते, राहुल थिटे यांचं मार्गदर्शन लाभतं़