भल्या पहाटेच पेटतात चुली; कानी येतो धाप... धाप... भाकरी थापल्याचा आवाज !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 09:26 AM2020-01-23T09:26:38+5:302020-01-23T09:28:28+5:30
माळशिरस परिसरात ऊसतोड मजुरांच्या वसाहतींमुळे घडतेय ग्रामीण संस्कृतीचे दर्शन
माळशिरस : पहाटेच्या वेळी शिवारात मोकळ्या जागी पालासमोर दिसणाºया मिणमिणत्या चुली... धाप.. धाप वाजणारे भाकरीचे आवाज... जनावरांच्या गळ्यातील घंटीचा खीण.. खीण.. आवाज हे चित्र सध्या शिवारात ऊस तोडणी कामगारांच्या खोप्यासमोर दिसत आहे.
माळशिरस तालुक्यात ऊस तोडणीसाठी धुळे, जळगाव, बीड जिल्ह्यासह परराज्यातूनही मजूर मोठ्या प्रमाणात ऊस तोडणीसाठी येतात यांची वस्ती शिवारात मोकळ्या जागी खोप्या करून पडलेली असते. ऊस तोडणी हंगामाच्या लगबगीमुळे दिवसभराची शिदोरी तयार करण्याची लगबग पहाटेपासूनच सुरू असते. यामुळे ग्रामीण जीवनशैलीचे विशिष्ट दर्शन या माध्यमातून आज घडत आहे.
मानवी उत्क्रांती पासून भटकंती मानवाच्या पदरी कायम होती.
सध्या माणूस स्थिरावला असला तरी पोटासाठी भटकंती थांबलेली नाही. शहरी संस्कृतीचा पगडा राहणीमान व आहारावर सर्वत्र दिसत असला तरी आजही चुलीवरच्या भाकरीची ओढ अनेकांना खिळवून ठेवते. पहाटे लवकर उठून ऊस तोडणीसाठी निघण्यापूर्वी दिवसभर पुरेल एवढ्या भाकरीची शिदोरी बांधूनच खोप्यावरून निघावे लागते. त्यामुळे ग्रामीण संस्कृतीचे खरे दर्शन भटकंती करणाºया ऊस तोडणी कामगारांच्या टोळ्यांमधून दिसून येत आहे.
चुलीवरील भाकरीची चवच न्यारी
- विविध प्रकारचे गॅस, विद्युत शेगडी, ओहम अशा विशिष्ट प्रकारांमध्ये भाजलेले अन्न अनेकांच्या अंगवळणी पडलेले आहे. ज्वारी, बाजरीसह विविध प्रकारच्या धान्याच्या पिठापासून भाकरी बनवल्या जातात. याबरोबर भाजलेली वांगी, चटणी, भाज्या यांचा आस्वाद घेणे तर काही औरच असते. मात्र ग्रामीण भागातील चुलीवरील भाकरीची ओढ आजही कायम आहे. बाजरी अथवा ज्वारीच्या पिठापासून हाताच्या सहाय्याने गोलाकार बनवलेली भाकरी लोखंडी तव्यावर विस्तवाच्या उष्णतेवर विशिष्ट पद्धतीने भाजल्या जाणाºया भाकरीची चवच मात्र न्यारी असते.